स्वत:चा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अधिकाधिक सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात सोलापुरात काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास आडकाठी आणली. त्यामुळे शेवटी अपेक्षेप्रमाणे आघाडी संपुष्टात आली.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु स्थानिक नेत्यांनी त्यास खो घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

१०२ जागांच्या सोलापूर महापालिकेत भाजप व शिवसेनेला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने कसलेही आढेवेढे न घेता आघाडी करावी, असे पवार व शिंदे यांनी बजावले होते. त्यासाठी दोन्ही काँग्रेसने जागा वाटपासाठी चर्चा करण्यासाठी प्रत्येकी चार सदस्यांची समन्वय समिती गठित केली.

या समित्यांच्या पाच-सहावेळा बैठका झाल्या. त्यात चर्चेचे गुऱ्हाळ चालले. राष्ट्रवादीने सुरूवातीला ४० जागांवर दावा केला. नंतर तो खाली येत ३० वर आला. आघाडी होण्यात कोणतीही अडचण ठरली नव्हती.

तथापि, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा स्वत:चा शहर मध्य विधानसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीवर अटी लादणे सुरू झाले. महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या १६ आहे. त्यापैकी ११ नगरसेवक शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आहेत. परंतु या विद्यमान ११ जागांपैकी ६ जागांवर राष्ट्रवादीने पाणी सोडावे आणि उर्वरित ५ जागांवर समाधान मानावे, असा अव्यवहार्य अट्टाहास काँग्रेसने केला.

हा अट्टाहास मान्य करणे राष्ट्रवादीला कदापि शक्य नव्हते. काँग्रेसचा आग्रह मान्य केल्यास राष्ट्रवादीचे उपमहापौर प्रवीण डोंगरे व ज्येष्ठ नगरसेविका बिस्मिल्ला शिकलगार यांनाही घरी बसावे लागले असते. गत विधानसभा निवडणुकीत दोन्ही कांग्रेसने आघाडी न करता एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. सोलापूर शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने विद्या लोलगे यांना संधी दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या ज्या नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला, हे क्रमप्राप्त होते. परंतु तो मु्द्दादेखील यंदा आघाडीसाठी काँग्रेसने प्रतिष्ठेचा केला.ज्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात प्रचार केला, त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊ नये, असाही आग्रह काँग्रेसने धरला. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वाभिमान दाखवत आघाडीस नकार दिला. यात सुशीलकुमार शिंदे यांना कन्याप्रेम आडवे आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.