अलिबाग तालुका काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी खरसांबळे व पोयनाड विभागाचे हेमनाथ खरसांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तालुक्यात आधीच कमकुवत असलेल्या काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

हेमनाथ खरसांबळे व मीनाक्षी खरसांबळे हे दोघेही काँग्रेस पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकत्रे म्हणून ओळखले जातात. अलिबाग तालुक्यातील अनेक नेत्यांनी अनेकदा पक्षबदल केले परंतु या दोघांनी काँग्रेसची कास कधीच सोडली नाही. ज्या खारेपाट भागात शेकापचा वरचष्मा आहे त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला, परंतु अलीकडच्या काळात आपल्या कामाची कदरच केली जात नसल्याने दोघेही नाराज होते. त्यामुळे अखेर दोघांनीही काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आठ दिवसांपूर्वी खारेपाटातील राजा केणी यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मीनाक्षी व हेमनाथ खरसांबळे दोघेही हजर होते. त्याच वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. येत्या मंगळवारी ३० ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. दरम्यान, जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आणि शेकापची युती आहे. त्यामुळे आतापर्यंत शेकापला विरोध केलेले खरसांबळे शेकापशी कसे जुळवून घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.