केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरातील रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) कार्यालयांसमोर आज (बुधवारी) आंदोलन केले. नागपूर येथे आरबीआयच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. दरम्यान लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री विलास मुत्तेमवार आदींनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मुंबईत आंदोलन करण्यापूर्वीच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईतील आंदोलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आदी नेते उपस्थित होते.

नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरातील आरबीआयच्या कार्यालयासमोर जनवेदना आंदोलनाचा भाग म्हणून घेराओ आंदोलन केले. या वेळी कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी व आरबीआयच्या विरोधात घोषणा देत होते. नागपूर येथील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी आरबीआयसमोर लावलेले बॅरिकेड तोडून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यकर्ते आक्रमक होत बॅरिकेडही तोडले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला. आंदेालक महिलांनी पोलिसांशी हुज्जत घातली. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी जाणूनबुजून काँग्रेस कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण व विखे पाटील यांनी केला आहे. जोपर्यंत लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन होत नाही. तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शंकरसिंह वाघेला व भारतसिंह सोलंकी यांनी अहमदाबाद येथील आरबीआय कार्यालयासमोर आंदोलन केले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर काँग्रेसने आंदोलन केले.