काँग्रेसने जागा वाटपात मोठेपणा न दाखविल्यास वेगळा विचार अपरिहार्य आहे, असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निक्षून सांगतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमच्या पक्षाने मदत केली नसती तर काँग्रेसच्या नावे भोपळा दिसला असता, अशा शब्दात काँग्रेसवर प्रहार केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार व तटकरे यांनी हा स्वबळाचा सूर आळवला. या वेळी मंत्री अनिल देशमुख, सचिन अहिर, आमदार प्रकाश गजभिये व आयोजक आमदार प्रा. सुरेश देशमुख उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणूक समविचारी पक्षाने मतांचे विभाजन होऊ नये म्हणून एकत्रित लढण्याचाच विचार आहे, पण काँग्रेसने जागा वाटपात कमीपणा दाखविला तर वेगळा स्वबळावर लढण्याचा विचार होईल. पक्षनेते शरद पवार व सोनिया गांधी हेच याविषयी अंतिम निर्णय घेतील. मोठमोठी आश्वासने देणाऱ्या केजरीवाल यांच्याबाबत जे घडले तेच मोदींबाबत घडेल. त्यांनी दिलेल्या खोटय़ा आश्वासनांपुढे आमच्या मोठय़ा विकास कामांची चर्चा झाली नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत सेना व भाजपची वेगवेगळी मते आहेत. रेल्वेच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही न देणाऱ्या केंद्र शासनाने एकटय़ा अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सात हजार कोटींची तरतूद केली. आताही ते गुजरातच्या पलीकडे पाहत नाहीत. कार्यकर्त्यांचा विश्वास खचू नये म्हणून राज्यभर निर्धार मेळाव्याचे आयोजन होत आहे, असेही पवार म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आघाडी शासनाने केलेल्या कामांची प्रशंसा करून लोक सभा निवडणुकीत यश न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त करताना पिकते तेथे विकत नाही, असे उद्गार काढले. काँग्रेसच्या सन्मानाची भाषा काँग्रेस नेते करतात, पण आम्हालाही सन्मान आहे. स्वाभिमान आहे. त्याच्याशी तडजोड करणार नाही. वर्धा जिल्ह्य़ासह सर्वच ठिकाणी जागा वाटपात आम्हाला निम्मा वाटा अपेक्षित आहे. सेना-भाजप हे आपले विरोधक आहेत, हे काँग्रेसने विसरू नये. २००९चा लोकसभा निवडणुकीतील यशाचा फोम्र्युलाच आता लागू करण्यावर आमचा आग्रह आहे. त्या वेळी त्यांना जागा वाढवून दिल्या. आता आम्हाला वाढवून हव्या. हिंगोली व नांदेडमध्ये जर राकाँने मदत केली नसती तर काँग्रेसच्या नावे भोपळा उमटला असता, असेही तटकरे यांनी बारामतीच्या संदर्भात झालेल्या टीकेच्या अनुषंगाने खडसावले.
आयोजक आमदार देशमुख यांनी प्रास्ताविकातून जिल्ह्य़ातील विविध प्रश्नांचा ऊहापोह केला. जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, पक्षनेते किशोर माथनकर, माजी आमदार राजू तिमांडे, सुधीर कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न नेत्यांपुरताच आहे. जनतेची तशी मागणी दिसत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करून विदर्भासाठी सर्वाधिक निधी आघाडी सरकारने दिल्याचे नमूद केले. आमचा मुख्यमंत्री व्हावा, असाच आमचा प्रयत्न राहील. जास्त जागा निवडून आल्यास मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडणार नाही, अतिरिक्त मंत्रिपद दिल्यास मागणी मांडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी तडजोडीत अख्खे मंत्रिमंडळ दिले तरी मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याची गमतीदार टिपणी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आणखी काही बाबी तपासण्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र सदनाचे आयुक्त विपिन मलिक यांच्याबाबत तक्रारी होत्याच. त्याबाबत कळविले होते. अधिकारी चुकीचे वागत असतील तर दखल घ्यावीच लागणार. आता मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुढचे ठरेल, असे पवार यांनी या वेळी नमूद केले.
अच्छे दिनचे वचन मोदी विसरले -अजितदादा
धर्माच्या नावावर राजकारण करणारे मोदी सरकार सत्येवर येऊन दोन महिने झाले. मात्र, गॅस, पेट्रोल, डिझेल, रेल्वे भाडे वाढल्याने ‘अच्छे दिन’चा जो वादा केला तो आता आम जनतेच्या दृष्टीने अपेक्षाभंग झाला असून मतदान घेण्यासाठी जे स्वप्न दाखविले होते त्याचा मोदी सरकारला विसर पडला आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
यवतमाळ येथील बलवंत सभागृहातील जिल्हा निर्धार मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रामुख्याने उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अन्न व औषधी प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, संदीप बाजोरिया, प्रकाश गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, जिल्हा राकाँचे अध्यक्ष नानाभाऊ गाडबले, सुरेश लोणकर, नगराध्यक्ष सुभाष रॉय व महिला आघाडीच्या प्रमुख क्रांती धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रवादीत निष्ठावंतांना व इमानदारीने काम करणाऱ्यांना संधी प्राप्त होते. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत १२६ मतांनी पराभूत झालेल्या तुमच्याच जिल्ह्य़ातील ख्वाजा बेग यांना पक्षाने संधी दिली असून ते संधीचे सोने करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांपेक्षा सुनील तटकरे यांचे भाषण कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारे ठरले. यवतमाळ जिल्ह्य़ाच्या आजच्या निर्धार मेळाव्यातून जिल्ह्य़ातनूा चांगला पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले. मेळाव्यात मनोहर नाईक, आमदार संदीप बाजोरिया व ख्वाजा बेग यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक नानाभाऊ गाडबले यांनी केले. जिल्ह्य़ात पक्ष अधिक मजबूत करण्याची ग्वाही मनोहरराव नाईक यांनी दिली. मेळाव्याचे संचालन सुरेश चिंचोळकर यांनी केले. आमदार संदीप बाजोरिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेली पत्रकार परिषद संपताच धनगर समाजाचे सुमारे १०० कार्यकत्रे थडकले व त्यांनी अजित पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. याप्रसंगी नारेबाजीही झाल्याने पोलिसांची धावपळ झाली. अजित पवार यांनी प्रथम बचत भवनातील आढावा बठकीला मार्गदर्शन केले.