संघाचे माजी पदाधिकारी व विधान परिषदेचे माजी सदस्य मा. गो. वैद्य यांच्या सत्कारानंतर विधिमंडळ सचिवालयात काँग्रेसकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. केवळ वैद्यच का, काँग्रेसच्या माजी सदस्यांचा सत्कार का नाही, असा सवाल करून काहींनी नागेश केसरींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्याने ते रजेवर निघून गेले आहेत.
भाजप व शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळातील वि. स. पागे प्रशिक्षण केंद्रातर्फे मा.गो. वैद्य यांचा सत्कार करण्यात आला. वैद्य हे ज्येष्ठ  पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. विधिमंडळात कार्यरत असलेल्या वि. स. पागे केंद्राने प्रबोधनाच्या भूमिकेतून या सत्काराचे आयोजन केले होते. त्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती घेण्यात आली होती. पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्कारावर काँग्रेसच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. केवळ वैद्य यांचाच सत्कार का, इतर अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचा सत्कार का नाही, असे सवाल काँग्रेसच्या वर्तुळातून सचिवालयाकडे उपस्थित करण्यात आले. अखेर अधिवेशनाच्या शेवटी आणखी एका ज्येष्ठाचा सत्कार घेण्याचे निश्चित करण्यात आले.
कम्युनिस्ट नेते ए. बी. बर्धन यांचे नाव ठरवण्यात आले. बर्धन यांच्या सत्काराला मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी तात्काळ होकार दिला. मात्र, काँग्रेसकडून आणखी काही नावांचा आग्रह धरण्यात आला. विधिमंडळात सक्रिय असलेल्या पागे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे काम सदस्यांचे प्रबोधन करण्याचे असल्याने या सत्काराला पक्षीय स्वरूप देऊ नये, ज्येष्ठ व जाणत्या माजी सदस्यांचाच सत्कार करण्यात यावा, अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी मांडली. यानंतर बर्धन यांच्यासमवेत रा. सू. गवई, हरिभाऊ नाईक, एकनाथ साळवे, यादवराव देवगडे, हेमंत पटले, बी. टी. देशमुख, विठ्ठलराव धोटे, केशवराव पारधी, बळवंतराव ढोबळे व प्रभाकर मामुलकर यांचीही नावे निश्चित करण्यात आली. या सर्वाचा सत्कार येत्या २३ डिसेंबरला करण्याचे ठरवण्यात आले. मात्र, हे करतानाच विधिमंडळ सचिवालयातून अचानक सूत्रे फिरली व नागेश केसरी यांच्याऐवजी सहसचिव अशोक मोहिते या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करतील, असे तोंडी आदेश देण्यात आले. हा अपमान आहे, हे लक्षात येताच नागेश केसरी गुरुवारी सायंकाळपासून रजेवर निघून गेले आहेत.
या संदर्भात विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. प्रतिक्रिया मागवण्यासाठी पाठवलेल्या लघुसंदेशालाही त्यांनी उत्तर दिले नाही. केसरी यांच्याशी संपर्क साधला असता मी दीर्घ रजेवर आहे, असे उत्तर दिले.