जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या ९ सदस्यांच्या निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हापरिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ ३६ व काँग्रेसचे २६ असून बदलत्या राजकीय समीकरणामुळे ९ सदस्यांचे नेते महायुतीत दाखल झाल्याने पदाधिकारी निवडीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. काँग्रेसने पदाधिकारी निवडीसाठी मदतीचा हात पुढे केला असला,तरी राष्ट्रवादीने अद्याप कोणतीही सुस्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
जिल्ह्यातील १० पकी ६ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीने ३ पंचायत समितीमध्ये काँग्रेसने व एका पंचायत समितीत आघाडीने सभापतीपदे पटकावली आहेत. आता मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणा-या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक रविवारी दि. २१ रोजी होणार आहे.
जत आणि खानापूर येथील पंचायत समितीवर तांत्रिकदृष्टय़ा राष्ट्रवादीची सत्ता असलीतरी सभापती मात्र शिवसेनेत गेलेले विटय़ाचे माजी आमदार अनिल बाबर आणि भाजपाच्या वाटेवर असलेले विलासराव जगताप यांच्या गटाचे झाले आहेत. जिल्हापरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ३६ असले, तरी यापकी ९ सदस्य खा. संजयकाका पाटील, भाजपमध्ये गेलेले अजित घोरपडे, विलासराव जगताप व बाबर यांच्या गटाचे आहेत.
पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत झेंडा एकाचा, निष्ठा एकाशी असणा-या या सदस्यांनी राष्ट्रवादीसोबतच राहण्याचा इरादा व्यक्त केला आहे. दुस-या बाजूला पदाधिकारी निवडीत धोका होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अधिक सतर्क झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील गळतीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही काँग्रेसची आघाडी करण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादीने न मागता पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या सदस्यांची बठक शनिवारी दि. २० सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर सदस्यांवर एकप्रकारे दबाव आणण्याचे राजकारण यामागे असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नूतन पदाधिकारी निवडीसाठी येत्या दोन दिवसांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व गृहमंत्री आर.आर.पाटील यांची बैठक मुंबईत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
या वेळी जिल्हापरिषदचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी असल्याने तासगांव, आटपाडी व जत या तालुक्यातून निवडून आलेल्या ६ महिला सदस्या दावेदार आहेत. यापकी आटपाडीच्या मनिषा पाटील या प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय तासगांवच्या कल्पना सावंत व योजनाताई शिंदे, जतमधील सुनंदा पाटील, रेष्माक्का होर्तीकर आणि सुशीला होनमोरे यांची अध्यक्षपदासाठी दावेदारी आहे. उपाध्यक्ष पदासाठी लिंबाजी पाटील, रणजित पाटील, गजानन कोठावळे, संजीव सावंत, तानाजी यमगर, फिरोज शेख यांची नावे चच्रेत असली तरी लिंबाजी पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे.