नांदेड महापालिकेत काँग्रेसला मोठे यश; सर्वच समाजघटकांना संधी दिल्याने जनतेचा कौल

नांदेडमध्ये शंकरराव चव्हाण व नंतर अशोक चव्हाण हे समीकरण. नांदेडने नेहमीच चव्हाणांना साथ दिली. पण गेल्या तीन दशकांच्या राजकीय कारकीर्दीत अशोकरावांच्या नेतृत्वाखाली मिळालेले घवघवीत यश म्हणजे चमत्कार अशीच प्रतिक्रिया उमटली आहे. या साऱ्या समाजघटकांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयोग यशस्वी झाला. साऱ्या समाजघटकांच्या पाठिंब्यामुळेच चमत्कार घडला.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची ही पाचवी  निवडणूक होती. मागील २० वर्षांत एक वर्षांचा अपवाद वगळता गेली १९ वर्षे अशोकरावांची सत्ता आहे. अशोकरावांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी राज्यात सत्तेवर असलेला भाजपने सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती; पण भाजपसह शिवसेना, एमआयएम या पक्षांना चव्हाण यांनी एकहाती नेस्तनाबूत करताना सत्ता कायम राखली.

ही निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून काँग्रेसच्या विरोधकांसह राजकीय निरीक्षक, प्रशासकीय यंत्रणा अशा साऱ्यांना नांदेड मनपात काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळून हा पक्ष सत्ता स्थापन करील याचा अंदाज होता, पण ८१ पैकी ७३ जागा मिळतील, असे कोणालाच वाटले नव्हते. अगदी स्वत: अशोक चव्हाण हे शेवटच्या टप्प्यात ५५ जागा जिंकू, असे आशावादी होते. भाजप सरकारने प्रभाग पद्धतीत नव्याने केलेल्या बदलांचा अन्य महानगरपालिकांमध्ये भाजपला लाभ झाला. नांदेडमध्ये मात्र हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. लातूरमध्ये काँग्रेसचा पराभव केलेले कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील व त्यांचे सहकारी तयारीत नांदेडमध्ये उतरले होते. भपकेबाज वातावरणनिर्मितीमुळे नांदेडचा सामना अटीतटीचा व रंगतदार होईल, असे अनेकांना वाटत होते; पण शेवटी तो पूर्णत एकतर्फी झाला.

काँग्रेसचे २२ मुस्लीम नगरसेवक

८१ जागांच्या या विभागणीतील पहिली ठळक बाब म्हणजे २० प्रभागांपैकी १४ प्रभागांतील सर्व जागा जिंकण्यात काँग्रेस पक्ष यशस्वी झाला. त्यातून पक्षाला ५६ जागा मिळाल्या.  या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने नांदेडमध्ये फोडाफोडीच्या राजकारणाचा अतिरेक केला तो त्यांच्या अंगलट आला. काँग्रेस पक्षाने २४ मुस्लिमांना उमेदवारी दिली होती. त्यातील तब्बल २२ जण विजयी झाले. २०१२ च्या निवडणुकीत नांदेडच्या भूमीत प्रथमच पाऊल टाकत एमआयएमने काँग्रेस पक्षाला मुस्लीमबहुल भागातच मोठे आव्हान देत तब्बल ११ उमेदवार निवडून आणले होते. ज्या नांदेडमध्ये एमआयएमचा राजकीय उदय झाला तेथेच त्यांची घसरण सुरू झाली. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव १५ जागांपैकी १४ जागा काँग्रेसने जिंकल्या. ओबीसी तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवरही काँग्रेसने मोठे यश प्राप्त केले. नांदेड शहरात शीख समाजाचेही लक्षणीय स्थान आहे. काँग्रेसने उमेदवारी दिलेले शीख समाजातील तिघेही विजयी झाले. मराठा, ब्राह्मण, लिंगायत, राजपूत अशा विविध जाती-धर्माच्या उमेदवारांना योग्य त्या प्रभागांत उमेदवारी देण्याचा प्रयोग या पक्षाने केला, तो यशस्वी झाला.

थोडय़ा मतांनी तिघे पराभूत

या निवडणुकीत काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका करुणा जमदाडे, ललिता बोकारे तसेच बालाजी जाधव व इतर पाच उमेदवारांचा पराभव झाला. त्यातील जाधव केवळ ३ मतांनी पराभूत झाले. शिवसेना गेल्या वेळी १५ जागांसह दुसऱ्या स्थानावर होती; पण या वेळी या पक्षाचा केवळ एकच उमेदवार निवडून आला. विद्यमान नगरसेवक बालाजी कल्याणकर विजयी झाले. मनपाच्या स्थापनेपासून नगरसेवक असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार व वीरेंद्रसिंघ गाडीवाले हे दोघेही पुन्हा निवडून आले. अशोक चव्हाण यांनी आपल्या नेहमीच्या कार्यशैलीनुसार या निवडणुकीत पक्षाला उतरवताना प्रत्येक बाबींचे सूक्ष्म नियोजन केले. पक्षाच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी शाश्वत विकासाचा ध्यास मांडला. राजकीय स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारणाऱ्यांच्या हाती मनपाचा कारभार सोपवू नका, असे भावनिक आवाहन करतानाच भाजप सरकारच्या कारभाराला केलेले लक्ष्य जनतेच्या पसंतीस उरतले हेच निकालातून दिसते.

पक्षीय बलाबल

काँग्रेस- ७३, भाजप- ६,

शिवसेना- १, अपक्ष- १