काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आलेले खा. अशोक चव्हाण यांना येथे आयोजित हितगूज मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या तीव्र भावनांना तोंड द्यावे लागले. प्रदेशाध्यक्षांसमोरच जिल्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना खडे बोल सुनावले. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणामुळेच जिल्ह्यात काँग्रेस लयास गेल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केल्यावर चव्हाणही अवाक झाले.
काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत येथे कार्यकर्ता हितगूज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्ते आणि नेत्यांनी गटातटाचे राजकारण विसरून एकदिलाने काम करण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. परंतु त्यांना लगेचच गटातटाच्या राजकारणाचा प्रत्यय आला. प्रा. उल्हास पवार यांनी मध्येच उठून व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांवर आरोप सुरू केले. व्यासपीठावरील मंडळी प्रत्येक वेळी वरिष्ठ नेत्यांसमोर पक्ष बळकट करण्याची ग्वाही देतात. नंतर मात्र गटातटाचे राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला. जामनेरचे नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी व्यासपीठावर बसलेल्या या नेत्यांनी जनतेत उभे राहून निवडून दाखवावे, असे आव्हानच दिले. केवळ फलकांवर छायाचित्र प्रसिद्ध करून जिल्ह्य़ात काँग्रेस मोठी होणार नाही. त्यासाठी जनतेच्या प्रश्नांकरिता रस्त्यावर उतरले पाहिजे, अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.
प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत जिल्ह्य़ातील काँग्रेस बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देत, आतापर्यंत झालेले चुकीचे निर्णय दुरुस्त करून लवकरच जिल्ह्य़ात मेळावा घेऊन व्यासपीठावर बसलेल्यांना नव्हे तर कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे नमूद केले.