लातूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या कंटेनरने पायी जाणाऱ्या दोन महिलांसह बैलगाडीला दिलेल्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यात चार वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी गावाजवळील मोठ्या पुलाजवळ सांयकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. धडक देऊन कंटेनर लातूरच्या दिशेने वेगात निघून गेल्यानंतर संतप्त नागरिकांनी धोराळा गावाजवळ कंटेनरची मोडतोड करून कंटेनर पेटवून दिला.

वेगात निघालेल्या कंटेनरने पायी घराकडे निघालेल्या मशिरा सय्यद आणि मुनीर पठाण यांच्यासह चार वर्षांच्या बालकाला धडक दिली. त्यानंतर बालाजीनगरजवळ एकामागे एक निघालेल्या बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. यात राजाभाऊ काळे (वय ७०), याकूब पठाण (वय ६५) हे दोघे जण जागीच ठार झाले. कंटेनरची धडक जोरदार असल्यामुळे दोन बैलगाड्यांचे चार बैल आणि एका शेळीचाही या अपघातात मृत्यू झाला. ढोकी ग्रामीण रूग्णालयात सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर कंटेनर पेटवून दिल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अपघातानंतर ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे लहान मुलाचा जीव गेला असल्याचा आरोपही ग्रामस्थंनी केला. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही केली आहे.