शिक्षणाच्या प्रेरणा महत्त्वाच्या असतात. सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी दृष्टी असावी लागते. ती विकत घेता येत नाही. संत एकनाथ, तुकाराम, नामदेव आणि बहिणाबाई कोणत्या विद्यापीठात शिकल्या, असा प्रश्न उपस्थित करीत शिक्षणाच्या प्रेरणा लक्षात घेऊन त्याचा उपयोग करायला शिकले पाहिजे, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५५व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव, कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे यांची या वेळी उपस्थिती होती.
भारताचे वर्णन ‘गरीब लोकांचा श्रीमंत देश’ असे केले जाते. परदेशात सॉफ्टवेअर इंजिनिअरची नेमणूक करताना भारतीयांना प्राधान्य असते. कारण तेवढी बौद्धिक गुंतवणूक आपण केली आहे. मात्र, शिक्षण पद्धतीत काही बदल गरजेचे आहेत. जर्मनीसारख्या देशात एका विषयात तो व्यक्ती तज्ज्ञ असावा, असे पाहिले जाते अन्यथा आपल्याकडे वनस्पतीशास्त्र व रसायनशास्त्र घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेणारी मंडळी बँकेत नोटा मोजत असतात! तेव्हा प्रश्न पडतो, त्यांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या कामाचा संबंध कसा जोडायचा? मूलत: संशोधनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. समाजात आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडायचे असेल तर प्रत्येकाने आपापल्या परीने थोडे का असेना सकारात्मक काम करायला हवे, असेही गडकरी म्हणाले. भय, भूक आणि भ्रष्टाचार मिटवायचा असेल तर टाकाऊपासून संपत्ती निर्मिती होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
दीक्षान्त समारंभात १६० पीएच. डी.धारकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, कुलसचिव गणेश मांझा, परीक्षा नियंत्रक वाल्मीक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. अशोक मोहेकर, डॉ. दत्तात्रय आघाव, डॉ. प्रतिभा पाटील, वसंत सानप, शिवाजी मदन, गणेश शेटकर, अप्पासाहेब हुंबे, संजय निंबाळकर, गीता पाटील यांची उपस्थिती होती.
संशोधनाची नागपुरी उदाहरणे आणि औरंगाबाद!
दीक्षान्त समारंभ हा राजकीय कार्यक्रम नव्हता. मात्र, नितीन गडकरींचे भाषणही राजकारणाला शिवणारे नव्हते. मात्र, त्यांनी दिलेली नागपूरची उदाहरणे औरंगाबादकरांना आश्चर्यचकित करून गेली. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक सुरू असताना नागपूर महापालिकेतील चांगल्या उपक्रमांची माहिती गडकरींनी दिली. संशोधन कसे असावे हे विद्यार्थ्यांना सांगताना ते म्हणाले, ‘टाकून दिलेल्या वस्तूंपासून संपत्ती निर्माण करता येते. नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना एकदा सांगितले होते की, गावातून बाहेर पडणाऱ्या स्वच्छतागृहाचे पाणी आपण विकू शकतो. तेव्हाचे आयुक्त तुमच्याकडचे जैस्वाल होते. (तत्कालीन विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल). त्यांनीच पाण्याचा पुनर्वापर केला आणि महापालिकेला काही लाख रुपयांचा फायदा झाला.’ नागपूरच्या विकासाचे त्यांनी दुसरे उदाहरण दिले. केसांपासून अॅमिनो अॅसीड तयार होते. कृषी क्षेत्रात कीटकनाशकांसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. नागपूरमध्ये हा प्रकल्प सुरू केला आणि थेट तिरुपतीवरून ट्रकभरून केस मागवावे लागले. ते कमी पडले म्हणून आता डुकराच्या अंगावरच्या केसापासून प्रकल्प उभारला आहे. संशोधन या पातळीवरचे असावे, असे गडकरी सांगत होते. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाषण ऐकणारे औरंगाबादकर या नागपुरी उदाहरणांची तुलना औरंगाबाद महापालिकेशी करून पाहत होते.
वितरणाचा घोळ, उच्चारांवर शेरेबाजी!
राजशिष्टाचार भरभरून असणाऱ्या दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्र वितरण करताना मात्र घोळच झाला. विद्यार्थी समोर गेला की, हे प्रमाणपत्र त्याच्याच नावाचे आहे की नाही, हे शोधावे लागत असे. जे प्रमाणपत्र देण्यात आले, ते आपले नाही असे लक्षात येताच पीएच. डी.चे काही विद्यार्थी राज्यपालांसमोर अक्षरश: रेंगाळले. हळूहळू प्रमाणपत्रावरील नाव आणि विद्यार्थी तपासण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच करावी लागली. सूत्रसंचालन करणाऱ्या वाल्मीक सरवदे यांच्या उच्चारावरही ‘शेरेबाजी’ होत राहिली. ते म्हणाले, पीएच. डी. इन ‘भूगोल’. इंग्रजीत ‘जोग्रॉफी’ असा शब्द वापरण्याऐवजी दोन शब्द इंग्रजी, एक शब्द मराठी या उच्चारणाची कार्यक्रमानंतर चर्चा होती.