विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यासह सोमवारी दुपारनंतर आलेल्या वादळी पावसाने सुमारे पाऊण तास नाशिकला झोडपून काढले. नाशिक परिसरासह, चांदवड, पिंपळगाव बसवंत, देवळा भागात गारपीटही झाली. या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष व कांदा पिकांना बसणार असून, कोटय़वधी रूपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. नंदुरबार, शहादा, धुळे येथेही वादळी वाऱ्यासह सायंकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास प्रारंभी वादळी वाऱ्याने सलामी दिल्यानंतर अचानक टपोऱ्या थेंबांसह पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली.
 पावसापासून बचावासाठी सर्वाची धावपळ सुरू झाली असतानाच गारा पडण्यास सुरूवात झाली. सुमारे एक ते दीड तास गारपिटीसह पाऊस सुरू होता. शहरात अनेक ठिकाणी त्यामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळित झाली. त्यातच विद्युत पुरवठाही खंडित झाला.  
द्राक्ष, कांद्याला फटका
गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यंदा द्राक्षांसाठी अनुकूल हवामान असल्याने माल चांगल्यापैकी तयार झाला आहे. काळ्या द्राक्षांची काढणी मोठय़ा प्रमाणात सुरू असतानाच गारांनी झोडपल्याने तयार झालेल्या मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाचे नाशिक विभागीय माजी अध्यक्ष विजय गडाख यांनी दिली.