सावकारी परवान्यासाठी २८ हजाराची लाच घेत असताना तासगाव येथील सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिका-यास सोमवारी लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. त्याने सावकारी परवान्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती.
एका तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता तासगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात विविध कामांसाठी लाच मागण्यात येत असल्याची खात्री होताच लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक आफळे यांनी आपल्या सहका-याच्या मदतीने सापळा लावला होता.
कार्यालयातील लेखनिक वाघमारे आणि चव्हाण यांनी तक्रारदारांकडे सावकारी परवान्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. चर्चेमध्ये ही रक्कम २८ हजार रुपये ठरवण्यात आली. सोमवारी लाचेचे २८ हजार रुपये स्वीकारत असताना सहकारी अधिकारी विजय वसंत वाघमारे याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.