सहकार क्षेत्रातून सिंधुदुर्गचा विकास करण्यासाठीच सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. पुढील काळात उस उत्पादक संस्था, जिल्हा दुग्धसंस्था अशा विविध संस्था निर्माण करण्यात येतील असे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सावंतवाडीत बॅ. नाथ पै सभागृहात शुक्रवार २२ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. शिवाय पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा उपनिबंधक अभिजीत पाटील, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित राहतील असे काळसेकर म्हणाले. सिंधुदुर्गातील सहकार चळवळीतील सहकारमहर्षी कै. शिवराम भाऊ जाधव व कै. प्रा. डी. बी. ढोलम यांचे सहकार मेळावा निमित्ताने स्मरण करण्यात येईल असे अतुल काळसेकर म्हणाले. सहकार, पणन व बांधकाम अशी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाची खाती असणारे मंत्री चंद्रकांतदादा पाटील येत आहेत. त्यामुळे अडचणी त्यांच्याकडून सोडवून घेत नवीन संकल्प करता येतील. त्यासाठी सहकारातील प्रत्येकाने उपस्थित रहावे. राजकीय पादत्राणे बाजूला ठेवूनच सहकारात काम करण्याची गरजही अतुल काळसेकर यांनी व्यक्त केली.

इको सेन्सिटिव्हमुळे औद्योगिक संस्था काढणे कठीण बनले आहे. मजूर संस्थासमोर अडथळे आहेत. आमदार, खासदार निधी २५.१५चा निधी ई निविदा १० लाखपर्यंत करावी. जिल्हा दुधसंस्थेची पुनस्र्थापना व्हावी असे अतुल काळसेकर म्हणाले.

पतसंस्था फेडरेशनची ऑडिट फी कमी करण्याची मागणी सहकार संस्थांनी मान्य करून ७५ टक्के ऑडिट फी कमी केली. ऑडिट फी, गटसचिव व विकास संस्थाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार मंत्री ना. पाटील निश्चितच सहकार्य करतील असा विश्वास काळसेकर यांनी व्यक्त केला. सहकाराशी सर्व संबंधित क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करताना कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षमीकरण करण्याचा उद्देश काळसेकर यांनी विशद केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा दुग्ध संघाचे सक्षमीकरण व्हावे असा प्रयत्न आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उसाचे क्षेत्र व उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे उस उत्पादक सहकारी संस्था निर्माण करता येईल. पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी वापरण्यासाठी पाणी वापर संस्था निर्माण करून जमीन दुपिकी लाभ मिळवून देण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याचा मानस काळसेकर यांनी व्यक्त केला.

जिल्ह्य़ाची आर्थिक वाहिनी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्य़ालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने सहकार कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे अतुल काळसेकर म्हणाले.

यावेळी प्रभाकर सावंत, मनोज नाईक, अ‍ॅड, सिद्धार्थ भांबुरे, बाळू राऊळ, सागर हरमलकर, आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर व पदाधिकारी उपस्थित होते.