गडचिरोली पोलीस दलाने नियुक्त केलेले विशेष पोलीस कर्मचारी नरेश येरावार (३०) याची भरदिवसा कोंबडाबाजारात नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली पोलीस ठाण्यांतर्गत कोलेलगुडा येथील आहे. नक्षलवाद्यांनी आठवडाभरात केलेली तिसरी हत्या आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अक्षरश: थैमान घातले आहे. गेला आठवडाभर नक्षलवाद्यांनी येथे हिंसाचाराचे सत्र आरंभले आहे. कोलेलगुडा येथे रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोंबडा बाजार सुरू होता. येथे विशेष पोलीस कर्मचारी नरेश येरावार आले होते. ही माहिती नक्षलवाद्यांना मिळताच चार सशस्त्र नक्षलवादी मोटरसायकलने कोंबडाबाजारात आले. तेथे त्यांनी नरेश येरावार यांना घेरून त्यांची भरचौकात हत्या केली व हवेत गोळीबार करीत ‘आम्ही जंगलात निघून जाईपर्यंत पोलिसांना माहिती द्यायची नाही’, अशी धमकी देऊन ते मोटरसायकलने निघून गेले. तोपर्यंत येरावार यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यातच पडून होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.