महापालिकेच्या कारभारामागे ‘गैर’ हा शब्द जणू उपजत जोडला गेला आहे, असे सर्वत्र चर्चिले जाणारे चित्र किमान बदलले जावे, महापालिकेची प्रतिमा काही अंशाने उजळ व्हावी, म्हणून महापौर त्र्यंबक तुपे व उपमहापौर प्रमोद राठोड यांनी नागरिकांसाठी ‘इंटरॅक्टिव्ह व्हॉइस सिस्टिम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला जाईल आणि या क्रमांकावरून वेगवेगळ्या चार प्रकारच्या सुविधा तातडीने मिळाव्यात, या साठी ही प्रणाली काम करेल, असे उपमहापौर राठोड यांनी सांगितले.
शहरात कोठे आग लागली तर अग्निशामक दलाला दूरध्वनी केला जातो. तो क्रमांक आठवला नाही वा लागला नाही तर नागरिक हैराण होतात. या नवीन क्रमांकाला दूरध्वनी केला, तर त्यावरूनही आता अग्निशामक दल पोहोचू शकेल. वॉर्डातील खरी अडचण श्वानपथकाची असते. भटके कुत्रे आवरा अशी विनंती कोठे करायची, हेच माहीत नसते. नागरिक नगरसेवकांना दूरध्वनी करतात आणि नगरसेवक श्वानपथक प्रमुखांना शोधत असतो. यापुढे ही प्रक्रिया करावी लागू नये, म्हणून या व्हॉइस सिस्टिममध्ये श्वान वाहनांची मदत मिळण्याची प्रक्रियाही सुलभ होणार आहे.
आर्थिक अडचणीत असणाऱ्या महापालिकेकडे कर भरून घेण्यासाठीही अनेकांना मिन्नतवारी करावी लागते. तसेच शहरातील पाण्याचे प्रश्नही गंभीर असल्याने आलेल्या तक्रारी कंपनीने सोडविल्या की नाही, हे कळणेही अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या व्हॉइस सिस्टमच्या आधारे नवीन प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मंगळवारी देण्यात आली. महापौर व आयुक्त प्रकाश महाजन यांच्या दरम्यान या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही प्रणाली आठ दिवसांत कार्यान्वित होईल, असा दावा करण्यात आला.
महापालिकेत बसणार वाय-फाय
महापालिकेतील इंटरनेटची सुविधा कासवगतीची असल्याने ती सुधारण्यासाठी नवीन बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या. वीजलाइनची क्षमता वाढविण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच कारभार गतिमान केला जाईल, असेही सांगण्यात आले.