अजित पवारांसारखे उंदीर आज सिंह झाले आहेत. सत्तेचा माज चढल्याने त्यांना अहंकार आला आहे. अशांना येत्या १५ तारखेला त्यांची जागा दाखविण्याचे काम मतदारांनी करावे, भाजपाचे सरकार आल्यास महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना तुरुंगात डांबू, असे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. रविवारी बाजार समितीच्या मदानावर भाजपाचे परभणीतील उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारार्थ शाह यांची जाहीर सभा झाली. तर जालनाच्या सभेत त्यांनी दुष्काळास राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले. पापी काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे महाराष्ट्रात दुष्काळ पडला. गुजरातने नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री पदी बसविल्यानंतर तेथील दुष्काळ बेपत्ता झाला होता, असेही ते आवर्जून म्हणाले.
परभणी येथील सभेत शाह म्हणाले, सहकार, कृषी, उद्योग आदी क्षेत्रांत कधी काळी देशात सर्वात पुढे असणारे राज्य मागील १५ वर्षांत रसातळाला गेले. देशभर महाराष्ट्राचा नावलौकिक होता. संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आणि आदर्श असणारे राज्य बुडवण्याचे पाप काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केले आहे.
साखर कारखान्यासह सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. भाजपाचे सरकार येताच सर्व गरव्यवहाराची चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू, असे शाह म्हणाले.
 जालना येथील सभेत अमित शहा म्हणाले की, राजाची नियत चांगली नसेल तर ईश्वरही त्यास मदत करीत नाही. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतास बोलणारे पंतप्रधान मिळाले आहे. नाहीतर काँग्रेसचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आवाज १० वर्षांत जनतेस ऐकावयासही मिळाला नव्हता. डॉ. मनमोहन सिंग विदेशात जात असत तेव्हा त्यांना कुणी विचारतही नव्हते. पूर्वी सीमेवरील गोळीबाराची सुरुवात आणि समाप्ती पाकिस्तान करीत आहे. आता गोळीबार पाकिस्तानने सुरू केला तरी तो बंद करण्याचे काम भारतीय सैन्याकडून होत आहे. राहुल गांधी यांच्या डोळ्यांवर इटालियन चष्मा असल्याने त्यांना मात्र हे दिसत नाही.