अकोला महापालिकेचे नवे आयुक्त सोमनाथ शेटे यांनी काही दिवसापूर्वी अगदी जुनी देयके ठेकेदारांना अदा केली. ही देयके कोटय़वधीं रुपयांची असून या देयकांच्या सत्यासत्यतेची शहानिशा करण्यात आली नसून ती केवळ दलालीपोटी काढण्यात आली, असा घणाघाती आरोप उपमहापौर विनोद मापारी यांनी केला असून त्यांनी आयुक्त शेटे यांना एक पत्र लिहून या देयकांची माहिती मागविली आहे.

आयुक्त सोमनाथ शेटे यांनी जी कोटय़वधीची देयके नुकतीच प्रदान केली ती प्रत्यक्ष काम न होताच काढण्यात आली आहेत. केवळ नस्तीच्या आधारावर ही देयके सादर करण्यात आली व प्रशासनाने ती अदा केली. त्यांची शहानिशा करण्यात आली नसून मनपाचा कोटय़वधी रुपयांचा निधी वाया घालविला आहे. विशेष म्हणजे, आधीचे आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी येथील मॅक्सीम कॉर्पोरेशनला काळ्या यादीत टाकले होते. त्याच कंपनीला आता देयके दिली आहेत. ती सारी बनावट असून मनपाच्या अनेक ठेकेदारांनी खासदार, आमदार निधीतून करण्यात आलेल्या कामांना आपल्या मनपाअंतर्गत निधीत दाखवून त्यांचीही देयके पदरात पाडली आहेत, असा आरोप उपमहापौर मापारी यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. या प्रकरणात मोठय़ा प्रमाणावर दलाली घेण्यात आली असल्याने तेव्हा कोणत्या प्रभागात कोणते काम केव्हा व कोणत्या ठेकेदाराकडून करण्यात आले व या कामाच्या देयकाची रक्कम किती होती, या सर्व बाबींची माहिती त्यांनी आयुक्त शेटे यांना मागितली आहे. मनपाने १७ मार्च २०१४ ते २८ एप्रिल २०१५ या कालावधीत झालेल्या कामांची देयके दिली आहेत, असे दाखविले आहे. जो खर्च यातून दाखविला आहे तो खरोखर झाला असता तर हे शहर अत्यंत आधुनिक दिसले असते, असे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात ठेकेदारांनी अनेक वर्षांची देयके आता काढली आहेत व ती पूर्णत संशयास्पद आहेत, असे ते म्हणाले.

माजी आयुक्तांनी सह्य़ा केलेली देयकेच दिली
कुठलीही बोगस देयके देण्यात आलेली नाहीत. तत्कालीन आयुक्तांनी ज्या देयकांवर सह्य़ा केलेल्या होत्या त्याच देयकांचे पसे देण्यात आले आहेत. देयके अशी कोणीही काढत नाहीत. ती तपासली जातात. याशिवाय, मुख्य लेखापाल ती तपासूनच त्यावर सह्य़ा करतात. विभागीय आयुक्तांनी सुद्धा देयके देण्याचे आदेश दिल्यानंतरच देयकांची रक्कम देण्यात आली, असे महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सांगितले.
आयुक्त शेटे