यंत्रमाग कामगार हवाय? एक लाख रुपये अंगावर बाकी द्यायची तयारी ठेवा. न पेक्षा ७५ हजार रुपये तरी देणे भागच आहेत. किमान गेला बाजार ५० हजार रुपये मोजल्याशिवाय कामगार कारखान्याचा उंबरठाही ओलांडणार नाही. ही अवस्था आहे वस्त्रनगरी इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांची. कामगारांची आत्यंतिक टंचाई निर्माण झाल्यामुळे यंत्रमागधारकांना त्यांच्या अंगावर हजारो रुपयांची बाकी देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या व्यवहारात यंत्रमागधारकांचे सुमारे २५० कोटी रुपये कामगारांकडे थकीत स्वरूपात राहिलेले आहेत.
वस्त्रनगरी म्हणून इचलकरंजीचा लौकिक राज्यभर आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सोमवारपासून ५० हजारावर यंत्रमाग कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मासिक १० हजार रुपये पगार मिळावा वा आठ तासांच्या पाळीला दररोज ४०० रुपये वेतन मिळावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. वाढत्या महागाईला तोंड देताना यंत्रमाग कामगार मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून या भरघोष वेतनाची मागणी होत आहे.     
वास्तविक १९८४ सालीच यंत्रमाग कामगारांना किमान वेतन देण्याचा कायदा झाला. मात्र हा कायदा उद्योजकांनी खुंटीला टांगून ठेवला आहे. तर कामगार कार्यालयापासून ते कामगार मंत्र्यांपर्यंत साऱ्यांनीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे. किमान वेतन राहो काही कल्याणकारी सोयीसुविधा कामगारांना मिळाव्यात, तर त्याची वानवाच आहे.     
यंत्रमाग कामगारांची प्रचंड टंचाई गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये प्रकर्षांने जाणवू लागली आहे. कामगार कारखान्यात टिकून रहावा यासाठी त्याच्या अंगावर पैशाच्या रूपाने बाकी देण्याचे प्रमाण तेव्हापासूनच सुरू झाले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत तर त्याचा कळसच झाला आहे. २०-२५ वर्षांपूर्वी एखाद्या कामगाराच्या अंगावर पाच-दहा हजार रुपयांची बाकी असणे म्हणजे केवढा मोठा चर्चेचा विषय व्हायचा. पण आता मात्र कामगारांनी एक लाख रुपये मागितले तरी ते देण्यास यंत्रमागधारक का-कू करताना दिसत नाहीत. उत्तम पध्दतीने  काम करणाऱ्या कामगारास कसलाही लेखीपुरावा न ठेवताच लाखमोलाचा ऐवज सुपूर्त केला जातो. बऱ्यापैकी काम करणाऱ्या कामगाराला ७५ हजार रुपये तरी द्यावेच लागतात.  किमान वेतन, चांगली मजुरी देण्यास टाळाटाळ करणारा यंत्रमागधारक अंगावर मात्र हजारो रुपयांची बाकी देण्यास तयार होतो. अंगावरील बाकीचा गुंता इतका वाढीस लागला आहे की, शहरातील यंत्रमागधारकांनी २५० कोटींहून अधिक रुपये कामगारांना दिले आहेत. शिवाय एखाद्या कामगारांने ही रक्कम बुडविली तर ते वसूल करणेही हे यंत्रमागधारकांसमोर दिव्य आहे.