कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाकडे मुदत मागितली आहे. उच्च न्यायालयात जाण्यासाठी आरोपीच्या वकिलांकडून ही मुदत मागण्यात आली आहे.

कोपर्डी बलात्कार प्रकरणी मंगळवारपासून अहमदनगर सत्र न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणात जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. या तिन्ही संशयित आरोपींना मंगळवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील संतोष भवाळ आणि जितेंद्र शिंदे या दोन संशयित आरोपींनी सरकारी वकिलांची मागणी केली होती. बुधवारपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली.

नितीन भैलुमे या तिसऱ्या संशयित आरोपीने जामीन मिळावा, तसेच खटल्यातून मुक्त करावे, यासाठी वकिलामार्फत अर्ज केला होता. त्यावर पुरावा आणि साक्षीदाराची माहिती घेऊन सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाने नितीन भैलुमेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
काय आहे घटना ?
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात १३ जुलै २०१६ रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.