लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी सोलापूर जिल्ह्य़ात विशेषत: माढा भागात आचारसंहितेचा व शांततेचा भंग केल्याप्रकरणी नऊ गुन्हे घडले असून यात अकलूजमध्ये चार, तर सांगोल्यात तीन गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. मतदान केंद्रात आम आदमी पार्टीची विशिष्ट टोपी डोक्यावर परिधान करून बसणाऱ्या कार्यकर्त्यांविरूध्द करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माढा मतदारसंघात करमाळा तालुक्यातील खडकी येथे लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना आम आदमी पार्टीच्या उमेदवार अॅड. सविता शिंदे यांचे कार्यकर्ते भारत नारायण शिंदे (रा. खडकी) हे ‘आम आदमी पार्टी’ व ‘आप’ असा मजकूर लिहिलेली टोपी डोक्यावर परिधान करून मतदान केंद्रात आले व  तेथेच बसले. तेव्हा मतदान केंद्राध्यक्ष वाय. आर.तांबोळी यांनी हरकत घेत त्यांना डोक्यावरील ‘आप’ची टोपी काढण्यास सांगितले. परंतु त्यास नकार दिल्याने अखेर तांबोळी यांनी फिर्याद नोंदविली. त्यानुसार करमाळा पोलिसांनी शिंदे यांच्याविरूध्द भारतीय दंड संहिता व लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अकलूजमध्ये यशवंतनगर जिल्हा परिषद शाळेत मतदान सुरू असताना मतदारांना घरी पोहोच न केलेल्या मतदानाच्या स्लिपा वाटप करण्याचे काम सुरू होते. त्यास अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी आक्षेप घेत स्लिपा हिसकावून घेतल्या. याप्रकरणी मतदान केंद्र अधिकारी नरप्पा कदरगे यांनी  दिलेल्या फिर्यादीनुसार सुजय सुनील गोडसे याच्याविरूध्द अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. असेच प्रकार अकलूजच्या संग्रामनगर, बागेची वाडी व माळीनगर येथे घडले. या तिन्ही घटनांमध्ये ज्योती अनिल कुंभार (रा. अकलूज) या महिलेसह अन्य दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सांगोला येथे विद्यामंदिर मतदान केंद्राजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचे व नावाचे पत्रक सोबत बाळगल्याप्रकरणी राष्ट्रवादी व आघाडीच्या अज्ञात कार्यकर्त्यांविरूध्द सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर करमाळा तालुक्यातील जातेगाव येथे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगेत उभे राहिलेल्या संतोष गोरख वारे या ३० वर्षांच्या तरूणाला शिवीगाळ करून दमदाटी केल्याप्रकरणी ईश्वर केशव पाटील याच्याविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.