चार ग्रामस्थांना अटक ;जमावाकडून दीड कोटींचे नुकसान; जखमी पोलीसांवर उपचार

नेवाळी येथे जमीन बचाव संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनात दीड कोटींचे नुकसान केले आहे. यामध्ये पोलिसांची वाहने जाळणे, सार्वजनिक ठिकाणची नासधूस करणे, पोलिसांचे भ्रमणध्वनी व तांत्रिक यंत्रणेची नासधूस करणे असे प्रकार आंदोलकांकडून करण्यात आले आहेत. पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आंदोलकांवर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे पोलिसांकडून दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री चार मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची रवानगी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कुंदन म्हात्रे, योगेश म्हात्रे, आकाश म्हात्रे आणि विशाल सोरखाते अशी अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. नेवाळीचे शिवसैनिक व नेवाळीचे माजी सरपंच चैनू जाधव, भाजपचे मथूर म्हात्रे हेही या प्रकरणात आरोपी आहेत. विविध पथकांच्या माध्यमातून आंदोलकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे काम सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. नेवाळी येथील विमानतळाच्या जागेत नौदल विभागाने संरक्षण भिंत टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आपली मूळ जमीन आपणास परत मिळाली पाहिजे, या उद्देशातून व नौदलाच्या कामाला विरोध करण्यासाठी नेवाळी नाका येथे आंदोलन केले.

या आंदोलनात ग्रामस्थांनी नौदलाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांना पहिले लक्ष्य केले. पोलिसांची वाहने जाळणे, त्यांची फिरती, जलदगती पथकातील वाहनांमधील बिनतारी संदेश यंत्रणा, भ्रमणध्वनी जाळणे असे प्रकार ग्रामस्थांनी केले आहेत. या जाळपोळीत १ कोटी २३ लाखांचे नुकसान करण्यात आले आहे. नेवाळी नाक्यावरील सार्वजनिक मालमत्ता, उपलब्ध साधनसामग्रीचे २६ लाख ६५ हजार व ९ लाखाचे नुकसान करण्यात आले आहे.

महिला पोलिसांनाही मारहाण करून  त्यांचा ग्रामस्थांकडून विनयभंग करण्यात आला आहे, असे पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. चार जखमी पोलिसांवर डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका पोलिसाची दगड लागून बरगडी मोडली आहे. आंदोलनकर्ते नेवाळी, काकडवाल, भाल, डावलपाडा येथील रहिवासी आहेत. आंदोलनकर्त्यांनी पोलीस अटक करतील या भीतीने घर सोडून नातेवाईकांच्या घरांचा आश्रय घेतला आहे.

पोलिसांकडून टाळाटाळ

नेवाळी आंदोलनातील गुन्ह्याची माहिती देण्यास मागील दोन दिवसांपासून हिललाइन पोलीस ठाण्यातून टाळाटाळ केली जात आहे. गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी तुम्ही ‘शिवाजीनगर, मध्यवर्ती, बाजारपेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधा’ अशी दुरुत्तरे हिललाइन पोलिसांकडून देण्यात येत आहेत. अटक आरोपींची माहिती देण्यासही हिललाइन पोलिसांनी टाळाटाळ केली.