पैशांसाठी अपहरण करून जिवे मारण्याची धमकी

शेतीविक्री व्यवहारातील पशांसाठी एकाचे अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चिखली (ता. किनवट) येथील उपसरपंच आणि अपहृत व्यक्तीची मेव्हणी भागुबाई राठोड यांनी दिल्यावरून किनवट पोलिसांनी संजय गुडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय गुडे हा गोपीनाथ मुंडे नगरातील रेणापूर पानगाव साखर कारखान्याचा अधिकारी असल्याचे भासवत असून, कारखान्याच्याच पशाच्या वसुलीवरून अपहरण व जबर मारहाण प्रकरण घडल्याचे सांगण्यात येते.

ऊसतोड कामगार पुरवठा करणारा मुकादम शिवाजी चव्हाण याच्याकडून रेणापूर पानगाव कारखान्याचे ११ लाख रुपये येणे होते. ते व्याजासह वसूल करण्यास कारखान्याचा कथित अधिकारी संजय गुडे याने प्रयत्न चालवले होते. शिवाजीचा मेव्हणा विनायक सोमला राठोड याची दीड एकर जमीनही गुडे याने गहाण ठेवून घेतली होती; परंतु शिवाजी चव्हाण सापडत नसल्याने गुडे याने चिखली येथे जाऊन विनायक सोमला राठोड याचे मेव्हणी व चिखलीच्या उपसरपंच भागूबाई व्यंकटी राठोड यांच्या घरून अपहरण केले. पसे न मिळाल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली; पण घडलेल्या प्रकरणाची वाच्यता होऊन ते ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याने विनायक राठोड याला जबर मारहाण केलेल्या अवस्थेत परभणी परिसरात रस्त्याच्या बाजूला सोडून देण्यात आले. त्यानंतर विनायक कसाबसा तेलंगणातील नातेवाईकाकडे पोहोचला.

विनायक राठोड याची मेव्हणी भागुबाई राठोड यांनी गुरुवारी किनवट पोलिसांत तक्रार दिली. त्यात म्हटले आहे की, राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील विनायक सोनबा राठोड हे किनवटपासून दक्षिणेस १२ किलोमीटर अंतरावरील मौजे चिखली खुर्द येथे आपणाकडे आले होते. १० जूनला गुडे (लातूर) याने शेतीविक्रीच्या व्यवहारातील ११ लाख रुपये मुद्दल व ३ लाख रुपये व्याज असे एकूण १४ लाख रुपये विनायक राठोडकडून येणे असल्याने ते वसूल करण्यासाठी चिखली खुर्द येथे येऊन राठोड याच्याकडे पशाची मागणी केली. मात्र, पसे न मिळाल्याने विनायक राठोडचे गुडेने अपहरण केले. पसे न मिळाल्यास तुझा माणूस जिवंत मिळणार नाही, अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून किनवट पोलिसांनी संजय गुडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डावखोरे तपास करीत आहेत. किनवट पोलीस ठाण्यात गुडेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी भागुबाई यांच्याशी संपर्क साधला असता, विनायक हा अजूनही बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्याशी फक्त एकदा भ्रमणध्वनीवर बोलणे झाले होते; पण त्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागत नाही.