जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणाऱ्या मंगलाबाई सुंदर पवार या महिलेने प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण पुढे करीत अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शनिवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी तिला तत्काळ ताब्यात घेऊन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर उभे केले असता तिची जामिनावर सुटका झाली.
िहगोली तालुक्यातील मंगला पवार या महिलेचा पती सुंदर पवार याचा तीन मुलींसह तलावाच्या पाण्यात बुडून महिन्यापूर्वी मृत्यू झाला. या चौघांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपींना अटक करावी, ८ हेक्टर गायरान जमीन नावाने करावी, यासह इतर मागण्यांसाठी मंगलाने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. पती व तीन मुलींच्या मृत्यू प्रकरणात सरकारकडून तिला ९ लाख १७ हजार रुपये मिळाले. समाजकल्याण विभागाकडून तिला ५० हजार रुपयांची अपेक्षा होती. तसेच तिने दाखल केलेल्या तक्रारीतून आरोपींना न्यायालयाने जामीन दिला होता; तर तिला अपेक्षित असलेली गायरान जमीन नावे करून देणे प्रशासकीय यंत्रणेला शक्य नसल्याने याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची उपोषणस्थळी चर्चा होती.
प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे कारण पुढे करून या महिलेने शनिवारी अंगावर रॉकेल घेतले. तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांच्या ही बाब तत्काळ लक्ष येताच, त्यांनी या महिलेस ताब्यात घेतले व शहर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. िहगोली न्यायालयात उभे केले असता तिची जामिनावर सुटका झाली.