दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांना मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. जिल्ह्य़ाला छत्तीसगड व मध्यप्रदेशची सीमा लागून असल्याने पोलिसांसमोर सीमा सुरक्षित ठेवण्यासह तालुक्यात पोलिसांचा धाक निर्माण करण्याची वेळ आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी अत्याचाराचे ४६, तर विनयभंगाची ८६ प्रकरणे, तर यावर्षी अत्याचाराचे ५३ गुन्हे व विनयभंगाचे १०६ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे महिलांवरील वाढलेले अत्याचार चिंतेची बाब ठरत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, महिलांची छेड काढण्याचे ८६ प्रकरणे व अत्याचाराची ४६ प्रकरणे पोलिसांनी नोंदविली होती. २०१४ हे वर्ष संपण्यापूर्वीच ११ महिन्यातच अत्याचाराचे ५३, तर महिलांची छेड काढण्याची १०६ प्रकरणे पोलिसांनी नोंदवली आहेत. अत्याचाराच्या एकूण ५३ प्रकरणांपकी २८ प्रकरणे अल्पवयीनांवरील आहेत. दिल्लीतील अत्याचाराच्या प्रकरणानंतर शासनाने कठोर भूमिका घेऊन कडक नियम तयार करून महिलांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, यासाठी तयार केलेल्या कठोर नियमानंतरही अत्याचाराची प्रकरणे कमी न होता उलट या प्रकरणांचा आलेख वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना सायंकाळ होण्यापूर्वीच घरी परतण्याचा सल्ला देत आहेत. जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यात खुनाचे ३२, खुनाचा प्रयत्न करण्याचे २१, सदोष मनुष्यवधाचे ३, महिला अत्याचाराचे ५३, दरोडय़ाचे १, रस्त्यावर लुटमारीचे १५, चोरीचे २७७, दंग्यांचे २८, विश्वासघाताचे १०, भूलथापाचे ३८, फूस लावून पळवून नेण्याचे २२, अनधिकृतपणे घरात प्रवेश केल्याचे २१, नुकसान केल्याचे ७, भांडणतंटय़ाचे ३४४, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाणीचे ३४, विनयभंगाचे १०६, आत्महत्येचे १९, अपघातात मृत्युमुखी पडण्याचे १२३, नकली नोट प्रकरणाचे १, तसेच इतर २५४, अशा एकूण १ हजार ५२८ प्रकरणांची नोंद गोंदिया पोलिसांनी केली आहे. याशिवाय, विभाग क्र. ६ अंतर्गत येणाऱ्या प्रकरणात गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची २५ प्रकरणे नोंद करण्यात आले. याशिवाय, भादंविच्या भाग ६ अंतर्गत येणारे १५८ प्रकरणे, जुगाराचे १२५, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत ८, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत २, मुंबई पोलीस १३५ कलमांनुसार ८, मुंबई पोलीस १४२ कलमानुसार ७, मुंबई पोलीस १२२ कलमानुसार ३४, अवैध दारूची ९९७ प्रकरणे, एनडीपीएस कायद्यानुसार ४ प्रकरणे, मोटारवाहन अधिनियमानुसार ३३ प्रकरणे, कॉपीराईटचे १ व इतर ५५, अशा एकूण १ हजार ५५६ प्रकरणांची नोंद गेल्या ११ महिन्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्यापर्यंत न पोहोचणाऱ्या अनेक घटना आहेत. कधी कौटुंबिक वाद, कधी महिलांशी संबंधित घटना घडल्यावर महिला पोलिसांकडे तक्रार करण्यास येत नसल्याचीही अनेक प्रकरणे आहेत. त्यामुळेच अत्याचार व विनयभंग करणाऱ्या गुन्हेगारांचे मनोधर्य वाढत आहे. जिल्ह्यातील बहुतांश गावात तंटामुक्त गाव समिती कार्यरत असतानाही गुन्हे वाढतच आहेत. तंटामुक्त समितीनंतर पोलीस ठाण्यात येणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्यासह पोलिसांचा धाक गुन्हेगारांच्या मनात निर्माण व्हावा, या हेतूने पोलिसांना तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.