महापौरपदाच्या निवडणुकीत याहीवेळी अपहरणनाटय़ाचे उपकथानक तयार झाले आहे. काँग्रेसच्या नगरसेविका तथा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम शेख यांनी आपल्या वडिलांचे शिवसेनेने अपहरण केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या भावाने कॅम्प पोलीस ठाण्यात तशी फिर्यादही दाखल केली असून, पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे.
शेख यांचे बंधू शेख शरीफ नवाज यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम व महापौरपदाचे उमेदवार सचिन जाधव यांच्या विरोधात वडिलांच्या अपहरणाची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ३६३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत कदम व जाधव यांनी दर्गादायरा येथील आपल्या घरी येऊन आम्हाला मतदान करावे असे सांगतानाच त्यासाठी वडिलांना पळवून नेले असे या फिर्यादीत म्हटले आहे.
शेख या सध्या मनपातील सत्ताधा-यांच्या सहलीत सहभागी आहेत. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेशीही चर्चा केली होती, नंतर त्या पुन्हा सत्ताधारी गटात दाखल झाल्या, असे सांगण्यात येते. त्यांनी गुरुवारी सहलीच्या ठिकाणाहून ‘लोकसत्ता’शी संपर्क साधून वडिलांच्या अपहरणाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, कदम व जाधव यांनी माझ्या वडिलांना पळवून नेल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून त्यांचा ठावठिकाणा नाही. शिवसेनेच्या पदाधिका-यांना आपण विनंती करूनही त्यांनी अद्यापि वडिलांना सोडलेले नाही. आता तर आपल्याला घातपाताची शंका येते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. राजकारणासाठी वयस्कर व सज्जन माणसाला शिवसेनेने वेठीस धरू नये, असे त्या म्हणाल्या. याबाबत आपण जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्याशीही संपर्क साधल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात हा चर्चेचा विषय बनला असून महापौरपदाच्या गेल्या निवडणुकीतही असाच प्रकार झाला होता. त्या वेळीही सत्ताधारी गटातीलच नगरसेविकेच्या अपहरणाची फिर्याद शिवसेनेच्या पदाधिका-यांविरुद्ध देण्यात आली होती.
कदम यांचा इन्कार
शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मात्र या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. ते म्हणाले, शेख यांच्या वडिलांच्या अपहरणाची तक्रारच खोटी आहे. मी सध्याही नगरमध्येच आहे. शेख व सत्ताधारी आघाडीकडूनच राजकीय कारणासाठी अपहरणनाटय़ रचण्यात आले आहे. शेख या एकीकडे अपहरणाचा आरोप करताना दुसरीकडे स्वत: मात्र सहलीत वाढदिवस साजरा करतात, असा टोलाही कदम यांनी लावला.