नोकरीचे व पैशाचे आमिष दाखवून नाचगाण्यासाठी कला केंद्रात आणलेल्या, पुणे जिल्हय़ातील दोघी बहिणांना जामखेडमध्ये वेश्याव्यवसायास भाग पाडल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कला केंद्राच्या दोन मालकिणींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकीला अटक करण्यात आली आहे. गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघात कला केंद्रांचा व्यवसाय जोरात सुरू असल्याच्या घटनेवरही यानिमित्ताने प्रकाश पडला आहे.
जामखेडमध्ये ही घटना घडली. बुधवारी रात्री यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघी बहिणी दौंडमधील आहेत. यातील एक अत्याचारित मुलगी अल्पवयीन (वय १७) आहे. या प्रकरणी पूजा हिरामण पवार, भामा किसन जाधव व विशाल जाधव (तिघेही रा. जामखेड) यांच्याविरुद्ध भादंवि ३७३, ३७६ (१), बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध करणारा कायदा सन २०१२चे कलम ३, ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील भामाबाईला अटक करण्यात आली आहे. ती ‘जगदंबा’ नावाने कला केंद्र चालवते. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक इंगळे करत आहेत.
मुलींची घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. आई सतत आजारी असते. त्यामुळे दोन्ही बहिणी एका संस्थेमार्फत एकाकी वृद्धांना घरी मदत करण्याचे काम करायच्या. प्रथम एका रिक्षाचालकाने त्यांना काही दिवसांपूर्वी नोकरी व अधिक पैसे मिळण्याचे आमिष दाखवून पुण्यातील ‘झंकार’ या कला केंद्रात नाचगाण्याच्या कार्यक्रमासाठी आणले.
अधिक पैसे देण्याचे आमिष दाखवून पूजा पवार हिने दोघींना पुण्यातून जानेवारी २०१५ दरम्यान जामखेडमध्ये आणले. प्रथम तिला विशाल जाधव याच्या ‘घुंगरू’ या केंद्रात ठेवले. नंतर दोघींची रवानगी भामाबाईच्या जगदंबा कला केंद्रात करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी मुलींच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती. या प्रकरणात मुलींची विक्री झाली का, याचीही चौकशी पोलीस करत आहेत.
या गुन्हय़ाची गंभीर दखल घेतली असून अतिरिक्त पोलीस अधीक्षकांना तपास करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आल्याचे सांगितले. अल्पवयीन मुलगी मानसिक धक्क्यात आहे. ती शुद्धीवर आल्यावर या मागे ‘रॅकेट’ आहे, का याचा शोध घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.