गेल्या आठवडय़ात शहराजवळील पोहरा-मालखेड प्रस्तावित अभयारण्यात सहा नीलगायींच्या शिकार प्रकरणी आता दोघा आरोपींच्या विरोधात वीज कायदा २००३ च्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंगलात शिकारीसाठी वीज प्रवाहाचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई झाली आहे.
अमरावती शहरानजीकच्या पोहरा-मालखेडच्या जंगलात एका तलावाजवळ सहा नीलगायींची शिकार करण्यात आली होती. निसर्ग संरक्षण संस्थेच्या पक्षीमित्रांना एक शिकारी ट्रॅक्टरमधून नीलगायींचे मृतदेह बांधून नेताना दिसला. तेव्हा शिकारीचा प्रकार उघडकीस आला होता. तलावानजीकच्या शेतात तार लावलेली आढळूल आली होती, या तारेमध्ये महावितरण कंपनीच्या तारांमधून जिवंत वीज प्रवाह सोडण्यात आला होता. तारांवर आकडे लावले होते.
या प्रकरणात शेतमालक श्यामू बाबाराव गवळी (रा. शेवती) आणि ट्रॅक्टरचालक अर्जुन धनराज राठोड या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर वन विभागाच्या वतीने या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली, पण न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरही दखल घेतली गेली. केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य किशोर रिठे यांनी आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमाअंतर्गत आणि सोबतच वीज कायद्याअंतर्गत कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती.
‘महावितरण’ ने आरोपींच्या विरोधात वीज कायदा २००३ च्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र आहे. यापूर्वी अनेकवेळा जंगलांमध्ये महावितरण कंपनीच्या विजेच्या खुल्या तारांचा वापर करून शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांची शिकार  केल्यांनतरही त्यांच्या विरोधात वीज कायद्यानुसार गुन्हा नोंदवला जात नव्हता, पण या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून आरोपींच्या विरोधात या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. नीलगायींच्या शिकारीच्या वेळी गुन्ह्य़ात वापरण्यात आलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याची माहिती सहायक वनसंरक्षक जयंत तराळे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
 या प्रकरणात तपासाचे काम पूर्ण झाले असून वन विभागाला बरेचसे पुरावे हाती लागले आहेत. याशिवाय न्याय वैद्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ासंदर्भातील माहिती महावितरण कंपनीला देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पोहरा-मालखेड प्रस्तावित अभयारण्यात नीलगाय, चितळ, तडस, बिबट यासारख्या वन्यप्राण्यांचा मोठय़ा प्रमाणावर वावर आहे. नीलगायी शेतात शिरून शेतीचे नुकसान करीत असल्याने काहींनी त्यांची शिकारच करण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे नीलगायींसह इतर वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.