जे एकमेकांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी नाशिक महापालिकेत काय केले, ते सगळ्यांनाच कळले आहे. शिवसेना मात्र अशी कोणासमोर वाकणार नाही वा तुटणारही नाही, असा शब्दांत शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी मनसेला टोला लगावला.
शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांच्या शिवसैनिकांचा मेळावा संत तुकाराम नाटय़मंदिरात शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्टार प्रचारकांची गर्दी होती. सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे, नाटय़अभिनेते शरद पोंक्षे, नितीन बानगुडे पाटील आदींची उपस्थिती होती. या वेळी शिवसैनिकांना वेगवेगळ्या पातळीवर भावनिक आवाहन करण्यासाठी या तिन्ही प्रचारकांनी विषय वाटून घेतले होते. पोंक्षे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी व हिंदुत्व यावर मार्गदर्शन केले. बांदेकर यांनी शिवसेनेची जडणघडण व बाळासाहेबांच्या आठवणी जागविल्या. बाळासाहेब नाहीत, म्हणून विधानभवनावर भगवा फडकावण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, याचे मार्गदर्शन केले, तर बानगुडे यांनी राज्यातील आघाडी सरकारवर खास शैलीत टीका केली.
विकास आणि योजनेचे लग्न!
एका गावात शेतकऱ्याने आपल्या मुलाचे नाव ‘विकास’ ठेवले, तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या मुलीचे नाव ‘योजना’ होते. या दोघांचे लग्न लावून देण्यात आले. ‘विकास’ कामानिमित्त वेगळीकडे, तर ‘योजना’ दुसऱ्याच गावात राहिली. परंतु तरीही जेवणाचा डबा पोहोचवणे सहज शक्य होते. ‘योजना’ रोज डबा घेऊन जाई. मात्र, वाटेत सगळे खाई! ‘विकास’ एके दिवशी गावी परतला. परंतु तो कमालीचा रोडावला होता. महाराष्ट्र सरकारचे अगदी असेच आहे. ‘योजना’ फुगल्या आणि ‘विकास’ रोडावला, अशा खरमरीत शब्दांत बानगुडे यांनी आघाडी सरकारवर आसूड ओढला.