सिंचन घोटाळ्यावर बचाव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नर्मदा धरणाच्या किमतीची ढाल पुढे केली जात आहे. नर्मदा धरणाची किंमत ६ हजार कोटींवरून ३६ हजार कोटींवर जाते, तेव्हा कोणी काही बोलत नाही. मग महाराष्ट्रातीलच किमती वाढल्याचा बाऊ का केला जातो, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केला.
कन्नड येथील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, देशातील सर्वाधिक मोठे धरण गुजरातमध्ये बांधले जात आहे. अजूनही ते अर्धवट आहे. त्याची किंमत वाढतेच आहे. मात्र, त्या विषयी कोणी बोलत नाही. आघाडी तुटण्याच्या प्रक्रियेवरही पवार यांनी सभेत भाष्य केले. आघाडी टिकावी म्हणून मी स्वत: सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेलो होतो. त्या सकारात्मकही होत्या. मात्र, राज्यातील मुख्यमंत्र्यांनी एकदा बैठक घेतली आणि नंतर तीन दिवसांनी उमेदवार जाहीर करून टाकले, असे पवार म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारवरही त्यांनी टीका केली. या सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. विविध वस्तूंचे दर कमी केले जात आहेत. याची किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागेल, कारण आता सरकारची पावले वेगळ्या दिशेने पडू लागली आहेत, असा आरोप त्यांनी केला.