मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे अनेक नेते आहेत. मात्र, ऐन वेळी भाजप-शिवसेना युती तुटल्याने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचा चेहरा समोर आणायचा, या बाबत एक-दोन दिवसांत निर्णय होणे शक्य नव्हते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. अफझलखानाच्या फौजा महाराष्ट्रात प्रचारासाठी येत आहेत, असे म्हणणाऱ्यांचे ताळतंत्र सुटले आहे, असा आरोपही र्पीकर यांनी शिवसेनेवर केला.
हरिप्रसाद मंगल कार्यालयात शहरातील विविध घटकांशी भाजपने संवाद साधला. व्यासपीठावर भाजपचे प्रदेश चिटणीस अॅड. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, उमेदवार आनंद भरोसे, डॉ. मीना परताणी, अनिल मुद्गलकर, राजस्थानचे आमदार रामलाल शर्मा, भाजपचे शहराध्यक्ष अजय गव्हाणे आदी उपस्थित होते. र्पीकर म्हणाले, की मोदी आपल्या प्रचारात महाराष्ट्राला महत्त्व देतात, याचे कारण या राज्याविषयी त्यांच्या मनात आदर आहे. व्यापाऱ्यांसाठी जाचक असलेल्या एलबीटीच्या मुद्दय़ावरही र्पीकर यांनी आपले मत मांडले. आपला जन्म व्यापारी कुटुंबात झाल्याने व्यापाराचा व व्यापाऱ्यांचा सत्यानाश एलबीटीमुळे होतो याची जाण आहे. भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर एलबीटीचा प्रश्न शिल्लकच राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ चारित्र्याच्या कारभारावर व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उद्दामपणावर र्पीकर यांनी या वेळी टीका केली.
गव्हाणे यांनी परभणी मतदारसंघात ‘एमआयएम’ची भीती दाखवून आपले संरक्षण धनुष्यबाणच करू शकतो, असा अपप्रचार सध्या चालू आहे, असे सांगून भरोसे यांना उमेदवारी देऊन परभणीच्या विकास व बेरजेच्या राजकारणाची सुरुवात केल्याचे सांगितले. सेनेने गेली २५ वष्रे परभणीच्या विकासात बाण खुपसला. त्यामुळे विकास थांबला आहे, अशी टीका त्यांनी केली. भरोसे यांनी परभणी शहर व ग्रामीण भागातील समस्यांचा डोंगर पार करायचा आहे, असे सांगून एलबीटीच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. शहरातील खड्डे, रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचे प्रश्न सोडविण्याची ताकद भाजपात आहे, असे सांगितले. सूत्रसंचालन मोहन कुलकर्णी यांनी केले. व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी संजय डहाळे, अनूप शुक्ला, नितीन वट्टमवार, शंकर गुजराथी, विश्वनाथ सोनटक्के यांची भाषणे झाली.  ‘युती तुटण्यास शिवसेनेतील सूर्याजी पिसाळच कारणीभूत’
वार्ताहर, जालना
शिवसेनेसोबतची युती भाजपने तोडली नाही. त्यास सेनेतील सूर्याजी पिसाळच जबाबदार आहेत. त्यांचा शोध त्यांनीच घ्यावा, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घनसावंगी मतदारसंघातील गोंदी येथे बोलताना लगावला.
भाजप उमेदवार विलासराव खरात यांच्यासाठी या सभेचे आयोजन केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख ‘मिस्टर क्लीन’ असा केला जातो. जे कामच करीत नव्हते, त्यांचा उल्लेख यापेक्षा वेगळा कसा होईल, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार सिंचन घोटाळय़ामुळेच गाजले. ते कमी होते म्हणून की काय, निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या गाडीत साडेचार लाख रुपये सापडले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्यामुळे गोव्यात भाजपची पाळेमुळे रोवली गेली. भाजप सरकार आल्यानंतर गोव्यातील स्थिती बदलली. केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रातही मतदारांनी भाजपला पूर्ण बहुमत द्यावे. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात अनेक बाबतींत स्वस्ताई आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ७५ रुपये लीटर आहे, तेच गोव्यात ५७ रुपये आहे. मुलगी ११ वर्षांची झाली की गोव्यात तिच्या खात्यात एक लाख रुपये सरकार जमा करते. विधवांच्या खात्यावर दरमहा साडेबाराशे रुपये जमा होतात. भाजपचे सरकार असल्यामुळेच गोव्यात हे शक्य झाल्याचे र्पीकर म्हणाले.