दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असतानाच, गारपीट आणि अवकाळी पावसाच्या रूपाने महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावले आहे. हवामानातील परस्पर विरोधी परिस्थितीमुळे राज्याच्या विविध भागांतील पिके आणि मोठ्या प्रमाणावर निर्यात होणाऱ्या आंब्याचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एका बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याअभावी शेतीतील पीक करपून गेले, तर उत्तर महाराष्ट्रात अवकाळी गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचा धीर सुटला आहे. कोकणात आंब्याचा मोहोर येण्याच्या काळातच अवकाळी पाऊस आल्याने फळाच्या उत्पादन आणि दर्जावर परिणाम होण्याच्या भितीने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आंबा बागायतदारांनी लाखो रुपयांची केलेली औषध फवारणी वाया गेली आहे. देवगडमधील आंबा बागा पूर्णपणे मोहरल्या होत्या पण वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मोहोर गळून पडला आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड, देवळा, लकमापूर, उमराणा, परसूल या गावात तर गारांचा खच पडला आहे. रुई गावात झालेल्या गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानापोटी तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करत या गावातील लोक विजेच्या खांबावर चढून आंदोलन करत आहेत.