आरोपीला घटनास्थळी नेता येईना!

कोपर्डीतील (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर अमानूष अत्याचार करुन तिचा खून केल्याच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे अडथळे जाणवू लागले आहेत. गुन्ह्य़ातील मुख्य आरोपीला अटक करुन आठवडय़ाचा कालावधी लोटला तरी, खातरजमा करण्यासाठी त्याला घटनास्थळी नेणे पोलिसांना गर्दीमुळे शक्य झालेले नाही. पुरावे जमा करण्यासाठी व घटनेची नेमकी माहिती घेण्यासाठी आरोपींना तेथे नेणे पोलिसांना गरजेचे वाटते.

या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (२२) याच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली. त्याला तपास अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्यापुढे हजर केले. बहिष्कारामुळे आरोपी शिंदे याच्या बाजूने शुक्रवारीही कोणी वकीलपत्र दाखल केले नाही. जिल्हा सरकारी वकिल सतीश पाटील व पाटोळे यांनी युक्तीवाद केला. पाटोळे यांनी तपासाच्या प्रगतीची न्यायालयाला माहिती देताना कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे तपासात अडथळा येत असल्याचे व आरोपीला कोपर्डीत नेणे शक्य झालेले नाही, याकडे लक्ष वेधले. शिंदे याच्या पोलीस कोठडीची मुदत पुढील बुधवापर्यंत (दि. २७) पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी कोपर्डीत वाढलेली वर्दळ, विविध राजकिय पक्षांच्या नेत्यांचे दौरे, आरोपीवर हल्ला होण्याची भीती, विविध आंदोलने यामुळे मुख्य आरोपी शिंदे याला गेल्या आठ दिवसांत कोपर्डी येथे नेणे शक्य झालेले नाही. या गुन्ह्य़ात संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) या आणखी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या रविवारी या दोघांना न्यायालयापुढे हजर केले तेव्हा त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

शुक्रवारीही शिंदे याला न्यायालयापुढे हजर करताना पोलिसांना मोठय़ा संख्याबळाचा वापर करावा लागला. मोठा जमाव जमल्याने विशेष दक्षता बाळगतच आरोपीला न्यायालयापुढे हजर करावे लागले. हा जमावही आरोपींवर चाल करुन येऊ पहात होता, परंतु पोलिसांनी प्रतिबंध केला. आरोपींवर जमावाकडून हल्ला होण्याची भीती पोलिसांना वाटते.

गुन्हा कसा केला, याची माहिती मिळवण्यासाठी तसेच गुन्हा केल्यानंतर आरोपी कोठे फरार झाला, कोठे लपला, त्याला कोणी आश्रय दिला, त्यावेळी त्याने कोणाला घटनेची माहिती दिली का, याची माहिती मिळवण्यासाठी शिंदे याला कोपर्डीत नेणे पोलिसांना आवश्यक वाटते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे आठवडय़ानंतरही आरोपीसह घटनास्थळी जाता न आल्याने त्याचा परिणाम गुन्ह्य़ाच्या तपासावर होऊ लागला आहे.

मोबाइलचा तपास

आरोपींना गुन्हा करण्यास कोणी प्रवृत्त केले का, यादृष्टीनेही पोलीस तपास सुरु आहे. कोठडीची मागणी करताना पोलिसांनी याही कारणांचा शोध घ्यायचे असल्याचे नमूद केले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी शिंदे हा त्याच्याकडील मोबाइल फेकून दिल्याची बनवेगिरी करतो आहे. हा मोबाइल मिळाल्यानंतरच त्याला गुन्हा करण्यास कोणी प्रवृत्त केले यावर प्रकाश पडेल. शिंदे याने गुन्ह्य़ात वापरलेली मोटरसायकल कोणाची आहे, याचाही तपास पोलीस करत आहेत.