काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हक्काच्या समजल्या जाणा-या सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या मतदानामुळे  विजयश्रीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची प्रचंड प्रमाणात उत्कंठा वाढली आहे. सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे यांचे कडवे आव्हान असलेल्या या निवडणुकीत सत्ताधा-यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण, भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रभाव, त्यातच नवतरूण मतदारांचा मतदानात  सहभाग आणि त्यातून वाढलेली मतांची टक्केवारी पाहता ही जागा राखणे काँग्रेसच्या दृष्टीने किती शक्य आहे, हे प्रत्यक्षात मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी कोणाचा ‘घात’ झाला आणि कोणाचा ‘लाभ’ झाला, याचीच चर्चा सार्वत्रिक स्वरूपात ऐकायला मिळत आहे.
सलग चौथ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी सज्ज झालेले सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ‘कृतज्ञते’च्या नावाखाली संपूर्ण मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात निरनिराळे मेळावे घेऊन शिंदे यांनी प्रचाराला चांगलीच गती दिली असताना महायुतीकडून भाजपचा उमेदवार कोण, हे निश्चित नव्हते. शिंदे यांच्यासमोर पुन्हा अ‍ॅड. बनसोडे यांना पुढे आणले गेले तरी प्रत्यक्षात महायुतीच्या प्रचारात कधीही उत्साहाचे वातावरण दिसून आले नव्हते. परंतु जेव्हा ९ एप्रिल रोजी होम मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली, तेव्हापासून मतदारसंघातील स्थिती झपाटय़ाने बदलत गेली आणि सुरुवातीला एकतर्फी वाटू पाहणारी ही निवडणूक विलक्षण चुरशीची ठरली.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेसनेही मित्रपक्ष राष्ट्रवादीसह प्रा. जोगेंद्र कवाडे व गवई गटाच्या रिपब्लिकन पक्षाची मदत घेऊन चांगलाच जोर लावला खरा; परंतु मतदानाच्या दिवशी दिसून आलेले वातावरण काहीसे वेगळेच होते. जिकडे तिकडे मोदींच्या नावाची झालेली चर्चा यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये सावधानता दिसून आली. यातच सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात कोणी व किती प्रमाणात काम केले, कोणी व कसा ‘घात’ केला, याचीही गुपित चर्चा काँग्रेस भवनापासून ते सात रस्त्यावरील सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य बंगल्यापर्यंत होती. काँग्रेसच्या तुलनेने राष्ट्रवादीकडून चांगली कामगिरी झाल्याचा दावाही होऊ लागला. मात्र या निवडणुकीत शिंदे यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला हार पत्करावी लागणार, यावर ठामपणे विश्वास ठेवण्याची तयारी कोणाचीही दिसत नाही. यापूर्वी, १९७७ सालच्या जनता लाटेत सोलापुरात जनता लाटेचा प्रचंड प्रभाव असताना तत्कालीन जनता पक्षाचे दिवंगत नेते अप्पासाहेब काडादी हेच विजयी होणार म्हणून ठामपणे विश्वास बाळगून त्यांच्या अनुयायांनी भव्य विजयी मिरवणुकीची तयारी केली होती. परंतु मतपेटय़ा उघडल्या गेल्या तेव्हा जनता लाटेतही काँग्रेसचे सूरजरतन दमाणी हे निवडून आले होते. हा अनुभव पाहता काँग्रेसवासीयांनी शिंदे यांच्या विजयावर दावा केला आहे, तर याउलट, भाजपच्या गोटात विजयाचे गणित मांडताना मताधिक्याचे गणितही मांडले जाऊ लागले. अखेर या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आणखी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागणार असताना आतापासून कोणाच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडणार, यावर मोठय़ा रकमांवर पैजा लागू लागल्या आहेत.