विधानसभा निवडणुकीमुळे काहीशी मंदावलेली दिवाळीची खरेदी गेल्या चार दिवसांत वाढल्यामुळे तसेच पुढील काही दिवसांतील सुटय़ांमुळे बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. तर रोख रक्कम पुरत नसल्याने अन्य बँकांकडून पैसे उपलब्ध करताना बँक व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशातच नव्या को-या नोटांची बंडले लक्ष्मीपूजनासाठी मिळावीत असा आग्रह सर्वच ग्राहक धरत असल्याने बँकांच्या रोखापालासमोर नवी डोकीदुखी निर्माण झाली आहे.
गेल्या चार दिवसांत बँकांमधून अब्जावधी रुपये वितरित करण्यात आले आहेत. बुधवारी अभ्यंगस्नान होऊन दिवाळीला सुरुवात झाल्यावर बँकांकडे ठेवींचा ओघ काही प्रमाणात वाढू लागल्याने पैसे उपलब्ध करून वाटण्याची दगदग थांबल्याचा आनंद कर्मचा-याच्या चेह-यावर सायंकाळी दिसत होता.
दिवाळी म्हटली, की सर्व प्रकारच्या खरेदीला उधाणच येते. यंदा दिवाळीवर निवडणुकीच्या घडामोडींचा परिणाम जाणवत होता. विधानसभा निवडणुकांचे निकाल येईपर्यंत दिवाळीच्या खरेदीकडे डोळेझाक झाली होती. निकालानंतर मात्र लोकांची पावले बाजाराकडे वळू लागली. याच वेळी कर्मचा-याच्या बोनसचे वाटपही विविध आस्थांपनामध्ये होऊ लागले. यामुळे बँकांमध्ये खात्यातील पसे काढून नेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली. ग्राहकांना रोख रक्कम पुरविताना बँक व्यवस्थापनाला कसरत करावी लागली.
काही मोठय़ा बँकांना तर छोटय़ा बँकांसाठीही रोख रक्कम पुरवावी लागते. चार दिवसांच्या अवधीत अशी रक्कम उपलब्ध करून तिचे ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य प्रकारे वितरण करणे हे व्यवस्थापनासमोर दिव्य बनले होते. एकमेकांची गरज ओळखून रोखनिधी परस्परांना पुरवत यावर मात करण्यात आली. बँका व त्यांच्या सर्वच शाखांमधून अब्जावधीची रोकड वितरित करण्यात आली. तसेच बँकांकडे अनेक छोटे व्यापारी, छोटे विक्रेते हे रिकरिंग ठेव योजनेत पसे गुंतवत असतात. दिवाळी तोंडावर आली की त्यांची दिवाळीसाठीची खरेदीही भरास येते. त्यांनाही रोख रक्कमेची मोठय़ा प्रमाणात गरज भासते. अशा ग्राहकांनाही रोकड देण्याची वेळ बँकांवर आलेली असते. बहुतेक बँकांनी दीपावली अगोदर आठवडाभर रोख रकमेचे नियोजन केलेले असते, तरीही ऐनवेळी मागणीत वाढ झाल्याने रोकड रकमेची उपलब्धता करण्यासाठी धावपळ करावीच लागते.
गुरुवारी लक्ष्मीपूजन असल्याने बँकांतील रोखापालांसमोर आज वेगळाच प्रस्ताव दिवसभर येत राहिला. बहुतेक ग्राहकांना लक्ष्मीपूजनासाठी नव्या को-या नोटांचे बंडल हवे होते. दहा, पन्नास, शंभर, पाचशे, हजार रुपये अशा नोटांची बंडले मागून घेण्यासाठी रोखापालसमोरची गर्दी हटत नव्हती. मागणीपर हुकूम नोटांची बंडले पुरविताना रोखापालांची दमछाक झाली होती. यावरून ग्राहक व रोखापाल यांच्यात दिवाळी दिवशीच शाब्दिक फटाके फुटल्याचेही पाहायला मिळाले.