भारताच्या सीमांचे संरक्षण करत सैन्यात ३६ वर्षे सेवा बजावून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २९ राज्यातून १२ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत आहे. गोवा राज्य हे २१ वे तर सावंतवाडी-महाराष्ट्र २२ व्या राज्यात प्रवास केल्याचे सेवानिवृत्त मेजर जनरल सोमनाथ झा यांनी बोलताना सांगितले.

मेजर जनरल सोमनाथ झा व त्यांच्या पत्नी झा यांचे स्वागत माजी सैनिक, विद्यार्थी आदींनी जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात केले. यावेळी रघुनाथ परब, डी. एस. पाटील, उमेश आईर, दीनानाथ सावंत, आप्पा राऊळ, सुनील राऊळ, प्रशांत मुळीक, कर्नल एन. आर. कुलकर्णी, अशोक म्हाडगूत, गजानन तेजम, सुभाष सावंत, दीपक राऊळ तसेच प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

भारत स्वातंत्र्य झाल्यापासून देश संरक्षणासाठी २१ हजार जवान शहीद झाले. त्या सर्वाना सायकलवरून भारतभ्रमण करीत २९ राज्यांतून १२ हजार किलोमीटर प्रवास करून श्रद्धांजली वाहत आहे. नवी दिल्ली अमरज्योत येथे एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात सायकल प्रवास पूर्ण होईल असे मेजर जनरल सोमनाथ झा म्हणाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या प्रति देशभरात आदर, प्रेम भावना निर्माण करण्याचे कामही करत आहे. देशातील लोकांनी सैनिकांबाबत प्रेमभावना ठेवताना देशाबद्दल स्वाभिमान बाळगावा म्हणूनही या प्रवासादरम्यान प्रांताप्रांतात सैनिकांबद्दल प्रेमभावनेचा संदेश देत आहे असे मेजर जनरल सोमनाथ झा यांनी बोलताना सांगितले.

दहशतवाद आज जगात आहे. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन दहशतवाद संपणार नाही असे मेजर जनरल सोमनाथ झा यांनी बोलताना सांगितले. देशासाठी बलिदान करणारे सैनिक असल्यानेच आपण सुखी जीवन जगत आहोत ही भावना प्रत्येकाजवळ असावी असेदेखील त्यांनी सांगितले. हरियाणा-अंबाला येथून मेजर झा २९ ऑक्टोबर २०१६ रोजी सायकलने निघाले आहेत. त्यापूर्वी ते सैन्यातून १५ दिवस अगोदर सेवानिवृत्त झाले आहेत.

सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव बालोद्यानात दोघा सायकलस्वारांची भेट झाली. २९ राज्यांचे भ्रमण करण्यासाठी निघालेले सेवानिवृत्त मेजर जनरल सोमनाथ झा आणि औरंगाबाद येथील अपंग सचिन रंगनाथ शेंडगे यांची भेट झाली.

सैन्यातून सेवानिवृत्त झालेले मेजर जनरल सोमनाथ झा शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २९ राज्यांच्या १२ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करण्यासाठी निघाले आहेत.

औरंगाबादचा अपंग सचिव रंगनाथ शेंडगे हा गेल्या आठ महिन्यांपासून निघाला आहे. तो सायकल यात्रा भारतदर्शन करत आहे. नाशिकचे बंकेश्वर, वैष्णवदेवी ते अमरनाथ, जम्मू-काश्मीर ते त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन ते गोवा दर्शन ते त्र्यंबकेश्वर असा सायकल प्रवास हा अपंग मुलगा करत आहे.

सावंतवाडीतून गोव्यात जाणारा तरुण थांबला तेव्हा सेवानिवृत्त सैनिक सोमनाथ झा आणि त्याची भेट झाली. या दोघांनीही चर्चा केली. हा अपंग देवदर्शन करत गावोगावची संस्कृतीची ठेवण अभ्यासत आहे, तर मेजर जनरल झा शहिदांना श्रद्धांजली वाहत देशातील सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबाबत देशाभिमान जागवत आहेत.