राज्यात गेल्या तीन वर्षांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये स्फोट होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून एकूण ६२ घटनांमध्ये २० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सिलिंडरमधून होणारी वायुगळती आणि त्यानंतर होणारा स्फोट, अशा घटनांमध्ये मोठी प्राणहानी झाली आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अहवालानुसार संपूर्ण देशात सिलिंडर स्फोटाच्या सर्वाधिक घटना ज्या राज्यांमध्ये घडल्या त्यात महाराष्ट्राचा क्रमांक पाचवा आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये २० जण मृत्युमुखी पडले, तर १२६ जण जखमी झाले. गॅस वितरकांना दोन वर्षांतून एकदा परिसरातील एलपीजी गॅस सिलिंडर्सची सक्तीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, पण हा विषय ते गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. घरगुती वापराच्या एलपीजीचा उपयोग करताना सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने सर्व ग्राहकांना योग्य मानकाच्या नळ्या वापरणे, सिलिंडर्सची कालमर्यादा तपासून पाहणे, गळती झाल्यानंतर सावधानता पाळणे, अशा गोष्टींसाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा दावा गॅस वितरक कंपन्यांकडून केला जात असला, तरी वायुगळतीच्या घटना वाढतच आहेत.
एलपीजीच्या सुरक्षित वापराविषयी ग्राहक जागरूकता वाढवण्यासाठी वेळोवेळी ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येते, पण त्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे गॅस कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गॅस सिलिंडर स्फोटाच्या घटनांमध्ये ग्राहकांना संरक्षण मिळवून देण्यासाठी आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तीनही तेल कंपन्यांनी विमा धोरण ठरवले आहे, पण त्यापासून बहुतांश ग्राहक अनभिज्ञ आहेत.

’राज्यात २०१२-१३ या वर्षांत सिलिंडर स्फोटाच्या ६ घटनांमध्ये १३ जण जखमी झाले होते.
’२०१३-१४ या वर्षांत १५ अपघातांमध्ये ११ जण ठार, तर ४४ जण जायबंदी झाले.
’२०१४-१५ या वर्षांत पुन्हा सिलिंडर स्फोटाच्या घटनांमध्ये वाढ होऊन त्यात ४ जण ठार, तर ६२ जण जखमी झाले होते.
’चालू वर्षांत एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये १० घटनांमध्ये ५ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर ७ जण जखमी झाले आहेत.