डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात स्कॉटलंड यार्डने मदत करण्यास नकार दिला आहे. सीबीआयने आज, शुक्रवारी तसा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये अशा प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासंबंधी आवश्यक असलेला करार नसल्याने स्कॉटलंड यार्डने तपासात मदत करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे सीबीआयने न्यायालयात सांगितले आहे.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला. सीबीआयने परवानगीशिवाय हा चौकशी अहवाल सार्वजनिक करू नये, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तर गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या विशेष चौकशी पथकाने तपासाचा अहवाल सादर केला असून, पुढील तपासासाठी आठ आठवड्यांचा कालावधी न्यायालयाकडे मागितला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींची ओळख पटली असून, आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहितीही पथकाने न्यायालयात दिली आहे.

दुसरीकडे तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याचा आरोप करत दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर त्यांनी ही निदर्शने केली. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापूरमध्ये हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्या प्रकरणांत साम्य असल्याने त्यांच्या हत्यांमागे एकच शक्ती असावी, असा संशय डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. तसेच एखाद्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडतात, पण दाभोलकरांच्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीत का, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उपस्थित केला आहे.