रोज नियमितपणे व्यायाम अथवा खेळ खेळल्यास आपण दवाखान्याला दूर ठेवू शकतो. आजारातून बाहेर पडण्यासाठीही नियमित व्यायामाचा फायदा होतो, असे प्रतिपादन लंडन ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार यांनी केले.
येथील हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये झालेल्या कार्यक्रमात अविनाश खैरनार लिखित ‘जिद्द’ या पुस्तकाच्या ‘ग्रेट’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन सुशीलकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी ज्याच्यावर हे पुस्तक बेतले आहे, त्या जलतरणपटू प्रसाद खैरनारच्या आजाराची पाश्र्वभूमी सुशीलकुमार यांना समजावून सांगण्यात आली. आज प्रसाद राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवितो हे समजल्यावर सुशीलकुमार यांनी प्रसादचे कौतुक केले. या प्रसंगी क्रीडा समीक्षक आनंद खरे, जिल्हा खो खो संघटनेचे सचिव मंदार देशमुख, प्रा. बाजीराव पेखळे, प्रा. हेमंत पाटील, प्रा. माणिक गायकवाड आदी उपस्थित होते. प्रसाद साडेचार वर्षांचा असताना ‘जीबीएस’ अर्थात ‘गुंलियन बॅरी सिन्ड्रोम’ नावाच्या आजाराने त्याचे संपूर्ण शरीर लुळे पडले होते. या आजारावर मात करण्यासाठी त्याने नियमित व्यायामासह पोहणे सुरू केले. नियमित सरावामुळे तो पोहण्यात तरबेज झाला.
या सर्व घडामोडी प्रसादचे वडील अविनाश खैरनार यांनी ‘जिद्द’ या मराठी पुस्तकाच्या माध्यमातून २००९ मध्ये वाचकांसमोर मांडल्या होत्या. ‘जिद्द’ या मराठी पुस्तकाचा ‘ग्रेट’ हा इंग्रजी अनुवाद वाचकांसमोर आणला आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांनी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.