नक्षलवाद्यांच्या हिंसेमुळे केवळ आदिवासीच होरपळतात, असा गैरसमज आहे, पण आदिवासीबहुल भागात दलित समाजसुद्धा नक्षलवाद्यांचे लक्ष्य ठरत आहे. आतापर्यंत १९ दलितांची हत्या नक्षलवाद्यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्णााच्या अहेरी तालुक्यातील आदिवासीबहुल गाव दमरंचा येथे दलित समाजाचे उपसरपंच पत्रू दुर्गे यांची १९ एप्रिलला नक्षलवाद्यांनी हत्या केली. आता याच गावात त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय भूमकाल संघटनेने घेतला आहे.
शहरी भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दलित तरुणांची दिशाभूल करणारे नक्षलवादी इतर भागात मात्र दलितांची हत्या करतात, हे १९ दलितांच्या हत्येने स्पष्ट झाले आहे. गडचिरोली व विशेषत: अहेरी भागात आंबेडकरी समाज राजकीयदृष्टय़ा जागरूक असून शिक्षण व रोजगारासाठी आग्रही आहे. दलित समाजाची संख्यासुद्धा या भागात लक्षणीय आहे.
काही गावात तर ही संख्या आदिवासींपेक्षा जास्त आहे. मात्र, नक्षलवादी या भागात शाळा सुरू होऊ देत नाहीत, रस्ते बांधू देत नाहीत, वीज येऊ देत नाहीत आणि त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे. शेकडो दलित तरुण बेरोजगार होऊन दलितांच्या मानवी अधिकाराचे हनन होत आहे. त्यासाठी नक्षलवाद्यांना विरोध करणाऱ्या दलितांना त्यांनी अमानूषपणे मारून टाकले. त्यांच्या दहशतीमुळे या परिसरातील राजकीय नेते गप्प बसले आहेत.
पत्रू दुर्गे हे या पंचक्रोशीत मान्यता पावलेले आंबेडकरी समाजाचे राजकीय, तसेच सामाजिक नेते होते. उपसा-सिंचन योजना, कृषी-विकास, दुर्गम भागाला रस्ते, अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला होता. त्यांची हत्या करून विकासाला विरोध करणाऱ्या नक्षलवाद्यांनी दलितांच्या आशा-आकांक्षाचीच हत्या केली. अशा परिस्थितीत पत्रू दुर्गे हेच खरे शहीद असून भूमकाल संघटना त्यांचे शहीद स्मारक दामरंचा गावात बांधणार आहे. हे काम धानकटाईपूर्वी स्थानिकांच्या मदतीने पूर्ण करण्यात येणार आहे.
भूमकाल संघटना गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात सातत्याने हिंसेच्या विरोधात आवाज उठवत आली आहे. याच संघटनेच्यावतीने शहीद स्मारक उभारण्यात येणार आहे.