वाशिमधील रिसोड तालुक्यातील घटना

वाशिम जिल्ह्य़ाच्या रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथील एक दलित महिलेचा विनयभंग करून तिला जाळल्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून रिसोड पोलिसांनी मंगळवारी आरोपीला गजाआड केले. या प्रकरणी एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, महिलेच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन ७ जणांनी बलात्कार करून मुलीला जाळल्याचा आरोप केला आहे.

मोठेगाव येथील ३२ वर्षीय महिलेचा ७ फेब्रुवारीला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रणजित देशमुख याने विनयभंग करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी १२ फेब्रुवारीला रणजित देशमुखविरोधात विनयभंग व जिवे मारण्याच्या प्रयत्नासह, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ६५ टक्के जळालेल्या महिलेला उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या कुटुंबीयांनी ५ मार्चला तिला घरी आणल्यावर ६ मार्चला दुपारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी रणजित देशमुखविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला रिसोड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलीस दलाने सतर्कता बाळगली आहे. त्या महिलेचा पती तिला वागवत नसल्याने गत १० वर्षांपासून दोन मुलांसह ती वडिलांकडेच राहत होती. त्या महिलेच्या वडिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांना दिलेल्या निवेदनात, त्यांच्या मुलीवर एकूण ७ जणांनी बलात्कार करून तिला पेटवून दिल्याची आणि रिसोड पोलिसांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, समाजमाध्यमांवर महिलेची जबानी असलेली ध्वनिचित्रफित फिरत आहे. ध्वनिचित्रमुद्रण कुणी केले, हे स्पष्ट झाले नाही. पीडित महिलेच्या मृत्यूपूर्व जबानीमध्ये तिने विनयभंग झाल्याचाच उल्लेख केला होता.