जलाशयांची धारणाशक्ती कमी करणाऱ्या गाळाची समस्या सार्वत्रिक असली, तरी राज्यात सर्वाधिक गाळ विदर्भातील धरणांमध्ये साठला आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार राज्यातील धरणांमध्ये साचलेल्या गाळाची टक्केवारी ३.७६ आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारीतील सिंचन प्रकल्पांमध्ये तब्बल ५.३६ टक्के गाळ आहे. पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुराबरोबर वाळू आणि गाळही वाहून येतो. नदीप्रवाह धरणाच्या ठिकाणी अडतो. तेथे पुराच्या पाण्याचा वेग कमी झाल्यामुळे तळाचा भरड गाळ तसाच साठून राहतो. अशा साठणाऱ्या गाळामुळे धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा दरवर्षी कमी कमी होत असतो. राज्यभरातील सिंचन प्रकल्पांचा संकल्पित एकूण पाणीसाठा ३० हजार ८३४ दशलक्ष घनमीटर आहे, तर उपयुक्त साठा २२ हजार ३४० दलघमी इतका आहे. कृष्णा खोऱ्यात ४.७७ टक्के, विदर्भात ५.३६ टक्के, तापी खोऱ्यात ०.६४ टक्के, कोकणात ०.९३ टक्के, तर मराठवाडय़ात ३.२६ टक्के गाळ आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) राज्यातील ६१ धरणांमध्ये येणाऱ्या गाळाचे सर्वेक्षण केले असून त्यापैकी १४ धरणांमध्ये सरासरीने ०.१ टक्क्यांपेक्षा कमी गाळ प्रतिवर्षी आला आहे. फक्त ३ धरणांची सरासरी वार्षिक टक्केवारी १ च्या आसपास आहे. एकूण सरासरीने ३४ वर्षांच्या कालावधीत या ६१ धरणांमधील पाणीसाठा केवळ ८.५ टक्क्यांनी कमी झाला आहे. गाळ साठल्यामुळे दरवर्षी सिंचन क्षमतेत सरासरीने ०.२५ टक्के घट होत असल्याचे निदर्शनास येते.
राज्यातील निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र यामधील तफावतीशी तुलना करता गाळ साठल्यामुळे सिंचन क्षमतेत होणारी घट ही अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चितळे समितीच्या अहवालात नमूद आहे. गाळ हे सिंचन क्षमता कमी होण्याचे एक महत्वाचे कारण श्व्ोतपत्रिकेत नमूद असले, तरी चितळे समितीने ते खोडून काढले असून ते वास्तवाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. दूरसंवेदन तंत्राच्या सहाय्याने सर्व मोठय़ा, मध्यम आणि प्रातिनिधिक लघू पाटबंधारे प्रकल्पांमधील प्रत्यक्ष गाळाचे सर्वेक्षण करण्याचा समयबद्ध कार्यक्रम आखण्याचे ‘मेरी’ने सुचवले आहे, तर अशा सर्वेक्षणानंतर येत्या आठ-दहा वर्षांत गाळाच्या टक्केवारीविषयी बिनचूक माहिती मिळेल आणि धरणांची क्षमता दरवर्षी किती कमी होत आहे, हे काढण्याच्या पद्धतीत शास्त्रशुद्धता आणि एकवाक्यता राहील, असे मत चितळे समितीने व्यक्त केले होते. विदर्भात अनेक धरणांमध्ये गाळाचे प्रमाण वाढले आहे. जमिनीची धूप हे त्यासाठी महत्वाचे कारण मानले गेले आहे. गाळ उपसून काढणे हे खर्चिक काम असले, तरी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असताना गाळ काढणे सोपे असते. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वृक्षआच्छादन वाढवून जमिनीची धूप थांबवणे हा एक उपाय सुचवण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेली वृक्षतोड ही धूप वाढवण्यास आणि परिणामी गाळ वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. धरणांमध्ये गाळ साचत असताना तो काढण्यासाठी उपाययोजना राबवल्या जात नाहीत.