यवतमाळ जिल्ह्य़ातही संपूर्ण दारुबंदी करावी, या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो महिलांनी सोमवारी शहरातून विशाल मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. महिलांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय पािठबा देऊन दारुबंदीच्या मागणीचे जोरदार समर्थन केले.
भारतीय सन्यात अधिकारी राहिलेल्या आणि दारूच्या व्यसनापायी मृत्यू झालेल्या रामन्ना पवार यांची कन्या संगीता पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे हे प्रचंड आंदोलन झाले. वडीलांच्या दारूच्या व्यसनाने ज्याप्रमाणे आपले कुंटुंब उध्वस्त झाले तशी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी संगीता पवार यांनी दारुबंदी आंदोलन हाती घेतले आहे. येथे वार्ताहर परिषदेत संयोजक संगीता पवार व उमेश मेश्राम म्हणाले, अनेक महिन्यांपासून जिल्हाभर फिरून या व्यसनांचे परिणाम लोकांना सांगून या आंदोलनाची तयारी केली. सर्व राजकीय पक्ष, विदर्भ जनआंदोलन समिती व दारुमुक्तीसाठी संघर्ष करणाऱ्या संस्था आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात दारुबंदी लागू आहे. आता यवतमाळ जिल्ह्य़ातही लागू करावी, ही आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्य़ात दारूचा महापूर असून या व्यसनापायी शासनाला जरी एका वर्षांत ४३ कोटी रुपयांचा महसूल मिळत असला तरी शेकडो कुटुंबाचे जीवन, विशेषत महिलांचे जीवन उध्वस्त होत आहे. हे सर्व थांबवण्यासाठी महिलांनीच आता कंबर कसल्याचे संगीता पवार म्हणाल्या. यावेळी आमदार मदन येरावार, संजीव रेड्डी बोदकुरवार, ख्वाजा बेग, राजू तोडसाम, राजू नजरधने यांनीही पािठबा देत विधिमंडळात ही मागणी रेटून धरण्याचे आश्वासन दिले.

उत्तिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरांनी बोधित:
यवतमाळ जिल्ह्य़ात संपूर्ण दारुबंदी व्हावी, या मागणीसाठी महिलांनी उभारलेल्या आंदोलनाला आपला शंभर टक्के पािठबा असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी त्यांना भेटलेल्या आंदोलक महिलांना सांगितले. रविवारी सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड या दोन्ही मंत्र्यांनी बचत भवनातील आढावा बठकीनंतर दारुबंदीसाठी आंदोलन करणाऱ्या शिष्टमंडळाला भेट दिली. तेव्हा मुनगंटीवार यांनी ‘उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत संघर्ष करीत रहा, मी तुमच्यासोबत आहे (उत्तीष्ठ, जाग्रत, प्राप्यवरांनी बोधित)’ असे सांगून स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाची आठवण करून दिली.

व्यसनमुक्ती आणि ‘सोमरस’
यवतमाळ जिल्हा व्यसनमुक्त व्हावा, यासाठी गेल्या ३० वर्षांंपासून काही राजकीय नेते, माजी मंत्री समíपत भावनेने काम करीत आहेत. मात्र, त्यांच्या या विधायक दीर्घकालीन कामातील काही सहकारी मात्र उक्ती आणि कृती यांच्यात समन्वय साधू शकत नसल्याचेही दृश्य जनता अनुभवत आहे. परिणामत त्यांच्या ३० वषार्ंपासूनच्या लढय़ावर ‘सोमरस’ फिरला आहे. व्यसनमुक्ती लढय़ात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कारही दिले जातात. कायद्याने झालेल्या दारुबंदीपेक्षा समाजप्रबोधनाने होणारी दारुबंदी अधिक परिणामकारक होत असते, असे प्रांजळ मत माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले आहे.