आज येईल.. उद्या येईल.. बिच्चारीचे डोळे थकले. पण वाट पाहणे सरले नाही. दोन मुली आणि एका मुलाचे संगोपन करण्यात माउली कुंकवाच्या धन्याची वाट पाहणे हळूहळू विसरून गेली. मायभूमीच्या रक्षणासाठी गेलेला तिचा भ्रतार हुरहूर मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला जाऊन तब्बल २१ वर्षांचा अवधी झाला. विरहावर काळ हेच औषध. मात्र दोन दिवसांपूर्वी लष्कराचा निरोप आला तो लेहच्या बर्फात गाडलेला वीर जवानाचा मृतदेह सापडल्याचा अन् माउलीच्या गोठलेल्या अश्रूंची अखेर फुले झाली.
तासगाव तालुक्यातील वडगाव येथील तुकाराम विठोबा पाटील हा १९७९ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी लष्करात दाखल झालेला तरुण. १९८५ मध्ये त्याचा इरळीच्या राजक्काशी विवाह झाला. विवाहानंतर रूपाली, स्वाती या दोन मुली आणि प्रवीण या तीन मुलांना राजक्काच्या हवाली करून तुकाराम सन्य दलाच्या सेवेसाठी १९९३ मध्ये दाखल झाला. २७ फेबुवारी ९३ पासून तो लेहनजीक सियाचीन ग्लेशियर या बर्फाळ प्रदेशात गस्तीसाठी गेल्यापासून बेपत्ता होता. तेव्हापासून त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. मृत घोषित करावे तर मृतदेह नव्हता. पाकिस्तानी लष्कराने कैदेत ठेवले असावे तर तसा अहवालही मिळत नव्हता.
जवान तुकाराम बेपत्ता असल्याचे त्याच्या पत्नीला कळविण्यात आले. लोकांनीही या हुतात्मा जवानाचा घाटशीळ येथे राममंदिरानजीक पुतळा उभारला. गावकरी हुतात्मा तुकारामची आठवण विसरून गेले. काळ कोणासाठी थांबत नाही हे ओळखून राजक्का माउलीने वेदनादायी आठवणी बाजूला सारून पदरी असणाऱ्या मुलांसाठी कंबर कसली. आज ही मुले मोठी झाली. स्वत:च्या पायावर उभारली.
हुतात्मा तुकारामाचा मृतदेह लष्कराला दोन दिवसांपूर्वी मिळाला. त्याच्या देहावरील लष्करी गणवेशावरून त्याची ओळख पटली. तशी माहिती वीरपत्नीला देण्यात आली. तब्बल २१ वष्रे हुतात्मा तुकाराम जिवंत नसला तरी मायभूमीच्या रक्षणासाठी गोठलेल्या बर्फात चिरनिद्रा घेत होता. या वीरजवानावर लष्करातच अंत्यविधी करण्यात येणार असून त्याच्या अस्थी दर्शनासाठी गावी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वीरपत्नीचे गोठलेले अश्रू आता पुन्हा प्रवाही झाले असले तरी मायभूमीच्या रक्षणासाठी त्या अश्रूंची फुले झाली आहेत.