सात वर्षांच्या भाचीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी नराधम मामाला शनिवारी फाशीची शिक्षा ठोठावली. शिराळा तालुक्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये हा अमानुष प्रकार घडला होता. शनिवारी इस्लामपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने संशयित तरुण विठ्ठल तुकाराम आटुगडे याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
आरोपी विठ्ठल आटुगडे वय २० याने दिवाळीत भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या चुलत बहिणीच्या सात वर्षांच्या मुलीला केस कापून आणतो म्हणून सायकलवरून नेले होते. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी ११ वाजता मुलीसह गायब झालेला मामा परतला नाही म्हणून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मात्र या मुलीचा मृतदेह येणपे गावच्या हद्दीत मिळून आला. तर संशयित तरुण एकटाच गावात परतला होता.
आरोपीने सायकलवरून भाचीला नेऊन निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार करून ती कोणाला तरी सांगेल या भीतीने तिचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह झाडीत पुरला होता. याप्रकरणी आरोपीविरुद्ध इस्लामपूर सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्या. आर. एन. सरदेसाई यांनी आरोपी आटुगडे याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अरिवद देशमुख यांनी काम पाहिले.