04 May 2016

शिवसेनेतील वाद काही केल्या थांबेना!

हकालपट्टीनंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांना गुदगुल्या होतील, अशा घटना सध्या

अविनाश पाटील, नाशिक | February 21, 2013 7:20 AM

हकालपट्टीनंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांना गुदगुल्या होतील, अशा घटना सध्या शिवसेनेत सुरू असून पक्षातील वाद संपण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जिल्हाप्रमुख बदलून झाले, नाराजांना पक्षातून काढण्यात आले, याउपरही जे नाराज असतील त्यांनी आताच पक्षातून बाहेर पडावे अशा इशाऱ्यासह विविध उपाय योजूनही शिवसेनेत वादविवाद सुरूच आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारे सुरू केली आहे. त्यातच महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी रोखण्यात केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आणि राज्यातील आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले असताना त्यातच दुष्काळाची जोड मिळाल्यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचे नेतृत्व करण्याची संधी एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे चालून आली. परंतु सद्यस्थितीत तरी शिवसेना अंतर्गत संघर्षांतूनच बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात नाशिकमधील शिवसेनाही अपवाद नाही. गटबाजी व वादविवाद हे येथील शिवसेनेसाठी आता परवलीचे शब्द झाले आहेत. नवा विरूध्द जुना, निष्ठावंत विरूध्द अनिष्ठावंत, पदाधिकारी विरूध्द शिवसैनिक अशा अनेक प्रकारच्या वादांना शिवसेना सामोरे गेली आहे आणि अजूनही जात आहे. याआधी अशा प्रकारच्या वादात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खडसावले की निमूटपणे सर्वजण ‘मातोश्री’ हून परत फिरत. बाळासाहेबांच्या पश्चात पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारणारे उध्दव ठाकरे यांनीही आपल्यातील मृदुपणा काहीसा बाजूला ठेवत कठोर धोरण स्वीकारण्याचे संकेत दिले असून त्यांच्या या स्वभावातील बदलाची चुणूक माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्या हकालपट्टीच्या निर्णयातून दिसून आली.
बागूल यांच्या हकालपट्टीनंतर पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या मेळाव्यात उर्वरित सर्वच पदाधिकाऱ्यांनी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा..’ चे दर्शन घडविले. त्यामुळे तूर्तास तरी शिवसेनेतील वाद शमल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु अधिक दिवस एकीचे दर्शन घडविणे पदाधिकाऱ्यांना शक्य नसल्याचे अलिकडेच दिसून आले. महापालिकेत झालेल्या बैठकीत वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नियुक्तीवरून वादंग झाले. या वादंगात सामील झालेल्या काहींनी असा प्रकार झाला हे मान्य केले तर काहींनी असे झालेच नसल्याचे स्पष्ट केले. परंतु या प्रकारानंतर थेट ‘मातोश्री’वर या मंडळींना धाव घ्यावी लागली. ‘एक पद एक व्यक्ती’ यासाठी काही जण आग्रही आहेत. साहजिकच या तत्वामुळे पदांची खिरापत अधिक जणांना मिळू शकेल. कार्यकारिणीचा विस्तार होत नसल्यानेही पक्षातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. कार्यकारिणी जाहीर केल्यावर ज्यांना पद मिळणार नाही, त्यांच्यामध्ये निर्माण होणारी प्रचंड नाराजी कशी दूर करणार, हे संकट अधिक मोठे आहे. सुनील बागूल यांच्या म्हणण्याप्रमाणे तेव्हा पुन्हा शिवसेनेतून काही जण बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ‘बागूलबुव्या’मुळे शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार लांबवित असली तरी या संकटास त्यांना कधीतरी सामोरे जावे लागणारच आहे.

First Published on February 21, 2013 7:20 am

Web Title: debate in shivsena is not stopping
टॅग Politics,Shivsena