संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या ‘पॉकेट डायरी’तून परशुरामाचे चित्र नसल्यामुळे आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करून संभाजी ब्रिगेडने साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा मागे घेतला. तर, यासंदर्भातील विरोधाची धार बोथट करण्यासाठी संमेलनस्थळी परशुरामाचे कट-आऊट लावण्याचा बेत संयोजकांनी रद्द केल्याचे समजते. संयोजक आणि संभाजी ब्रिगेड एक पाऊल मागे आल्यामुळे शुक्रवारपासून (११ जानेवारी) सुरू होणारा सारस्वतांचा उत्सव आता निर्विघ्न पार पडेल.
बाळासाहेब ठाकरे व्यासपीठ येथे शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. या दोन नेत्यांसमोर आंदोलन करत संमेलन उधळून लावण्याची हिंमत दाखविणे अवघड असल्याने संभाजी ब्रिगेडने परशुरामाचे चित्र हटविल्यामुळे बहिष्काराचे अस्त्र म्यान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. या पवित्र्यामुळे साहित्य संमेलन उधळले जाण्याचे सावट दूर झाल्याने संयोजकांनी संभाजी ब्रिगेडचे अभिनंदन केले आणि या नेत्यांना संमेलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरील भगवान परशुरामाचे चित्र आणि परशू ही प्रतीके हटविण्याची मागणी संभाजी ब्रिग्रेडने केली होती. त्यासाठी प्रसंगी, साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र भगवान परशुराम हे कोणत्याही जातीचे नाही, तर कोकणवासीयांचे देव आहेत अशी भूमिका संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी घेतली. संमेलनाच्या तोंडावर वेगवेगळ्या वादांना तोंड फुटत असताना संभाजी ब्रिगेड आपल्या इशाऱ्यावर ठाम होती. मात्र, पॉकेट डायरीतून, परशुराम हटविल्याबद्दल समाधान व्यक्त करीत संभाजी ब्रिगेडने हा इशारा मागे घेतला.
या संदर्भात प्रकाश देशपांडे म्हणाले,‘संभाजी ब्रिगेडने आंदोलन मागे घेतले ही आनंदाची गोष्ट आहे. साहित्य संमेलन सर्वाचे असून शारदेच्या दरबारामध्ये आनंदाने आणि उत्साहाने सहभागी व्हावे. कागदावर कोणते चित्र आहे यापेक्षाही त्या कागदावरची अक्षरे आणि त्या अक्षरांतून व्यक्त होणारा आशय महत्त्वाचा आहे.’
संभाजी ब्रिगेड आणि संयोजक या दोघांनीही एक पाऊल मागे येत या प्रश्नावर समन्वयाचा मार्ग काढला. त्यामुळे आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद संभाजी ब्रिग्रेडच्या पदाधिकाऱ्यांना आहे. तर, चिंतेचे सावट दूर होऊन आता संमेलन निर्विघ्नपणे पार पडणार याचा आनंद संयोजन समितीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
आजपासून सुरुवात
८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी चिपळूण नगरी सज्ज झाली आहे. मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाके व नियोजित अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्यासह निमंत्रित आणि संमेलन प्रतिनिधी येथे दाखल झाले आहेत.
पवारांचे ‘डॅमेज कंट्रोल’
संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामांचे चित्र हटविण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी आणि मुख्य व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याला प्रा. पुष्पा भावे यांनी घेतलेला आक्षेप यामुळे हे संमेलन गाजले होते. या पाश्र्वभूमीवर संमेलनाच्या व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या निर्णयात बदल होणार नसल्याचे स्वागताध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात स्पष्ट केले; आता हे संमेलन निर्विघ्न पार पडावे यासाठी, संभाजी ब्रिगेडला तंबी भरून खुद्द या संमेलनाचे उद्घाटक शरद पवार यांनीच ‘डॅमेज कंट्रोल’ केले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.