लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी लातूर मतदारसंघात प्रशासनाने तब्बल ११ कोटी ४२ लाख रुपये खर्च केला. मात्र, यातील केवळ ४ कोटी ४५ लाख ३२ हजार रुपये खर्चाचे पैसे संबंधितांना देण्यात आले. अजून ६ कोटी ९६ लाख ९० हजार २२७ रुपये देणे बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या खर्चाची बिले थकल्याने देणेकरी संभ्रमात आहेत.
निवडणुकीत उमेदवाराने केलेल्या खर्चाचा तपशील जनतेला सार्वजनिक करण्याचे बंधन घातले जाते. मात्र, निवडणूक प्रक्रियेत सरकारचा किती खर्च झाला, ते अभावानेच समोर येते. या पाश्र्वभूमीवर सुनील मंदाडे या कार्यकर्त्यांने माहितीच्या अधिकारात सरकारची देणी असलेल्या रकमांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यात सरकारने देणी दिलेल्या रकमेचा तपशील त्यांना मिळाला. मात्र, जे पैसे अजून द्यायचे बाकी आहेत, त्याचा तपशील मात्र त्यांना मिळू शकला नाही. मंदाडे यांनी या संदर्भात अपील केले आहे.
उमेदवाराच्या कित्येक पट रक्कम निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघात खर्च होते.
निवडणूक कर्मचारी भत्त्यावर १ कोटी ७४ लाख ३ हजार १५० रुपये खर्च झाला. अजून ८ लाख २७ हजार ५०० रुपये देय आहेत. निवडणूक काळात इंधनावरील खर्च ४७ लाख ८८ हजार ६८९ रुपये आहे. मंडप भाडे, खुच्र्या, टेबल याचा खर्च २ कोटी १२ लाख ९० हजार ९४१ रुपये असून, ही रक्कमही देय आहे. व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफीवर २७ लाख १५ हजार ६९० रुपये, निवडणूक निरीक्षकांवर १ लाख ८० हजार रुपये खर्च झाले. अजून १ लाख ५० हजार रुपये रक्कम देय आहे. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यावर २ लाख ६७ हजार ९५० रुपये खर्च झाला, तर १२ लाख ८८ हजार ८०० रुपये देय आहेत. चहा-नाश्त्यावर १३ लाख ७० हजार ९१५ रुपये खर्च झाले. अजून ४ लाख २६ हजार ३०५ रुपये देय आहेत.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत देशात सरासरी ६६.४० टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ६०.३६ टक्के, तर लातूरमध्ये ६२.८३ टक्के मतदान झाले. लोकशाहीत मताचे महत्त्व लक्षात घेऊन १०० टक्के मतदान व्हावे, असे आवाहन मंदाडे यांनी केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग पोले यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या पहिल्या पाच मतदारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.