लोकसभा निवडणुकीत स्वप्रचार करणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांकडे आपल्या निवडणूक खर्चाची दिलेली माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे आली. ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे अपेक्षित असताना जिल्हा निवडणूक विभागाने मात्र अजूनही उमेदवारांच्या खर्चाचे विवरण अपलोड केले नाही. निवडणूक विभागाला प्राप्त झालेली माहिती गहाळ झाली. दस्तऐवज सापडत नसल्याने निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचारी पुरते गोंधळले आहेत.
लोकसभा निवडणुकीत २७ उमेदवारांनी नशीब अजमावून पाहिले. पकी २५ जणांची अनामत जप्त झाली. महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड, काँगेस-राष्ट्रवादी आघाडीचे डॉ. पद्मसिंह पाटील, अपक्ष रोहन देशमुख या दिग्गजांसह २७ जणांनी प्रचारात आपापल्या पक्षांच्या टोप्या, झेंडे, कार्यकर्त्यांचे चहा-पान, तसेच वाहनांवर झालेला खर्च जिल्हा कोशागार अधिकाऱ्यांकडे सादर केला. खर्चाची संचिका मागील काही दिवसांत उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे यांच्याकडे सादर झाल्यानंतर त्यांनी तत्काळ ही माहिती आपण अपलोड केल्याचे सांगितले. परंतु ही माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड झालीच नसल्याचे समोर आले, त्यामुळे मुळे चकित झाले. या बाबत नायब तहसीलदार नाईक, संबंधित कर्मचारी खरसडे व मुकुंद बनसोडे यांच्यामार्फत त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर लिपिक संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची बदली झाली. त्याच्याकडेच उमेदवारांच्या खर्चाबाबतची संचिका आहे. त्याने ठेवलेली संचिका सापडत नसल्याचा प्रकार समोर आला.
लोकसभेत आचारसंहितेचे काटेकोर पालन करणारे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे विधानसभा निवडणुकीतही आचारसंहितेचे पालन होण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके नेमल्याचे सांगतात. आचारसंहिता लागू झाल्यावर तिसऱ्या दिवशी ४ गुन्हे दाखल झाले. आता निवडणूक विभागाकडील लोकसभेतील उमेदवारांच्या खर्चाची संचिका गहाळ झाल्याने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर डॉ. नारनवरे काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.