सोलापूर महापालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब मुदतीत सादर केला नाही म्हणून विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या काँग्रेसच्या ८ नगरसेवकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अपील दाखल केले असता त्यावर सुनावणी झाली. सर्वाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर येत्या सोमवारी निकाल सुनावण्यात येणार आहे.
पालिका निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशोब वेळेवर सादर न केल्याने विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांना पुढील तीन वर्षांसाठी अपात्र ठरविले आहे. या कारवाईचा फटका बसलेल्या नगरसेवकांमध्ये देवेंद्र भंडारे, म. रफिक हत्तुरे या दोन ज्येष्ठ नगरसेवकांसह परवीन इनामदार, सुजाता आकेन, राजकुमार हंचाटे, संजीवनी कुलकर्णी, विनोद गायकवाड, दमयंती भोसले यांचा समावेश आहे. या सर्वानी विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरूध्द राज्य निवडणूक आयोगाकडे अपील दाखल केले आहे. त्यावर आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व महापौर अलका राठोड व काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले उपस्थित होते. तर, महापालिकेचे प्रतिनिधी म्हणून सहायक आयुक्त पंकज जावळे यांची उपस्थिती होती. सर्वाचे म्हणणे स्वतंत्रपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी या अपिलावर येत्या सोमवारी निकाल देणार असल्याचे स्पष्ट केल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.