नागपूर प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक दीपक भट यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईनंतर राज्य शासनाने निलंबनाचे आदेश जारी केले. २९ मे रोजी भट हे पुणे येथे जाणाऱ्या बसमध्ये चढण्याच्या तयारीत असतानाच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील बॅगमधून १९ लाख २५ हजार रुपये जप्त केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वनपाल, वनरक्षकांच्या पातळीवरील बदल्यांचे अधिकार आस्थापना मंडळाला देण्यात आले. या अधिकाराचा दुरुपयोग करून दीपक भट यांनी ८५ वनरक्षक आणि १९ वनपालांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यातील एका वनरक्षकाच्या बदलीवरून दोन अधिकाऱ्यांमध्ये मतभेदही झाले होते. ही बदली भट यांनी रद्द केल्यामुळे संबंधित वनाधिकाऱ्यांनी बदली करताना ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केल्याचा आरोप वनपाल, वनरक्षकांच्या संघटनेने केला.